Maharashtra Beed News : बीडच्या (Beed) केज तालुक्यातील (Kej Taluka) कुंभेफळ गावच्या कोंडीबा रतन थोरात या शेतकऱ्याच्या दोन बैलाचा अज्ञात आजारानं 22 ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. बैल पोळ्याचा (Bail Pola 2022) सण तोंडावर असतानाच दोनही बैल दगावल्यानं शेतकऱ्याची मोठी निराशा झाली आणि आर्थिक नुकसानही झालं होतं. 


कोंडीबा थोरात हे शेती करून आपला उदरनिर्वाह भागवतात. त्यातच त्यांच्याकडे एक बैल जोडी (Pair of Bull) होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोनही बैल आजारी होते आणि अचानक त्यांच्या बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे मोठ्या आनंदात त्यांनी बैलपोळ्याची तयारी केली होती. बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ते जमवाजमव करत होते. मात्र बैलांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या आनंदावर विरझण पडलं. 


ही गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावातीलच काही दानशूर व्यक्ती आणि समाजसेवी संस्थांनी कोंडीबा थोरात यांना मदत करण्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केलं. कोंडीबा थोरात यांची आर्थिक परिस्थिती गरीब असल्यानं या आव्हानाला अनेक दानशूर लोकांनी साथ दिली आणि बघता बघता पोळ्याच्या पूर्वसंध्येला कोंडीबा थोरात यांना तब्बल 53 हजार रुपयांची मदत फोन पे (Phone Pay) आणि गुगल पेच्या (Google Pay) माध्यमातून जमा झाली.


मिळालेल्या मदतीच्या पैशातून त्यांनी आज नवीन बैल जोडी खरेदी केली असून मोठ्या आनंदात आणि उत्साहात ते पोळ्याचा सण साजरा करणार आहेत. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी शेतकरी मोठ्या आनंदात बैलपोळा साजरा करतात. वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते. मात्र याच दिवशी आपल्याकडे बैल नसल्याचं दुःख कोंडीबा थोरात यांच्या मनात होतं आणि काही दानशूर लोकांच्या मदतीमुळे आता ते मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :