Mahavitran MSEB News Beed Updates: बीड जिल्ह्यात अनेकांच्या घरामध्ये येणारे लाईटचे बिल (Light Bill) मागच्या काही दिवसापासून वाढले आहे. विशेष म्हणजे घरातील उपकरणं वाढली नाहीत तरीही बिल मात्र दर महिन्याला वाढून येत आहे आणि याचं कारण ठरलंय अंदाजे बिल देण्याची महावितरणची (Mahavitaran news) पद्धत. महावितरणच्या वीजबिलातील या गोलमालाचा सर्वसामान्यांना फटका बसतोय.
खंडाळा गावच्या शिला पवार यांच्या घरी सहा महिन्यापूर्वी लागलेल्या आगीमध्ये लाईटचा मीटर पूर्णपणे जळून खाक झाला होता. महावितरणचा प्रताप बघा की या जळालेल्या मीटरच्या अंदाजे रिडिंगमधून शीला पवार यांना कधी 7 हजार तर कधी 12 हजार अगदी 20 हजार रुपये पर्यंतचे बिल नियमितपणे येत आहे..
दोन बल्बच दर महिन्याचं बिल 27 हजार रुपये
महावितरणच्या गलथान कारभारामुळे जास्तीच्या बिलाचा शॉक फक्त शीला पवार यांनाच बसलाय असं नाही. तर याच गावातल्या छगन पवार यांच्या घरात दोनच बल्ब आहेत. दारावर असलेल्या मीटरवर वापरलेल्या विजेची रिडिंग दिसत असली तरी या दोन बल्बच दर महिन्याचं बिल 27 हजार रुपये एवढं आहे. या वाढीव वीज बिलाची तक्रार करून त्यांच्या चपला झिजल्या, मात्र बिलावरची रक्कम कमी झालीच नाही.
24 हजार वीज ग्राहकांपैकी केवळ 6 हजार मीटरचीच रिडिंग
ही केवळ एका गावाची स्थिती नाही तर बीड तालुक्यातील एकूण 24 हजार वीज ग्राहकांपैकी केवळ 6 हजार मीटरचीच रिडिंग प्रत्यक्ष जाऊन घेण्यात आली आहे. मागच्या महिन्यात या 24हजार पैकी तब्बल साडेसात हजार घर बंद होते, असा धक्कादायक अहवाल रिडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महावितरणला कळवल्याचे पुढे आले आहे.
महावितरणच्या बिलात कसा आहे गोलमाल..
बीडच्या ग्रामीण भागातील डिसेंबर महिन्यातली आकडेवारी
घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची संख्या 23 हजार 714
रिडिंग घेतलेल्या मीटरची संख्या 19 हजार 716
प्रत्यक्ष रिडिंग घेतलेल्या मीटरची संख्या 5 हजार 566
नादुरुस्त असलेले मीटर 2 हजार 90
घर बंद असलेल्या मीटरची संख्या 7 हजार 477
रिडिंग घेण्यास अशक्य असलेल्या मीटरची संख्या 4 हजार 636
आणि रिडिंग न घेतलेले मीटर 3 हजार 918
तब्बल 2387 जणांची रिडिंग ही एकाच ठिकाणी बसून घेतली
रिडिंग घेण्याचं काम प्रत्यक्ष मीटर समोर जाऊन फोटो काढून करणे बंधनकारक आहे. मात्र या चोवीस हजार वीज ग्राहकांपैकी तब्बल 2387 जणांची रिडिंग ही एकाच ठिकाणी बसून घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा समोर आला आहे. आता ज्या कंपनीकडे ही रिडिंग घेण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा होत आहे.
एकट्या बीड तालुक्यातील एवढी धक्कादायक परिस्थिती असेल तर मग आता जिल्हा आणि राज्याची परिस्थिती काय याविषयी विचार करण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या बिलांमध्ये असलेला गोलमाल हा काही नवीन विषय नाही. मात्र हा किती भयंकर प्रकार आहे याचा हा उत्तम नमूना म्हटला पाहिजे.