Samadhan Maharaj Sharma : रामकथाकार तसंच कीर्तनकार समाधान महाराज शर्मा (Samadhan Maharaj Sharma) यांची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली सांगली (Sangli) ते वाघोली हेलिकॉप्टर (Helicopter) वारी. कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना वाघोली (Wagholi) इथल्या कीर्तनासाठी पाच तास उशीर होत असल्यामुळे आयोजकांनी थेट हेलिकॉप्टर पाठवून महाराजांना आणण्याची व्यवस्था केली. यामुळे पाच तासांचा प्रवास अवघ्या 55 मिनिटात झाल्याने महाराष्ट्रात समाधान महाराजांची हेलिकॉप्टर 'वारी' चांगलीच चर्चेत आहे. सांगलीतील कथा झाल्यानंतर 55 मिनिटांमध्ये पुण्यातील (Pune) वाघोलीकडे हेलिकॉप्टरने महाराजांनी प्रवास केला. 


सध्या चर्चेत असलेले हे समाधान महाराज शर्मा कोण आहेत ते जाणून घेऊया....


- ह.भ.प समाधान महाराज शर्मा  हे मूळचे बीड जिल्ह्यातल्या केज येथील रहिवासी आहेत. 


- गेल्या 30 वर्षापासून ते राज्यातल्या वेगवेगळ्या भागात रामकथा सांगतात.. 


- कीर्तनकारांच्या तुलनेत राम कथा सांगणाऱ्या महाराजांची संख्या खूप कमी आहे 


- त्यामुळे राज्यात राम कथा सांगणाऱ्या ठराविक महाराजांपैकी शर्मा महाराज हे एक आहेत.. 


- राम कथा ही सात दिवस चालत असते..


- त्यामुळे राज्यात ज्यांना राम कथा लावायची आहे त्यांना काही महिने आधी या महाराजांच्या तारखा घ्याव्या लागतात 


समाधन महाराजांना सांगलीहून वाघोलीत आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था


राम कथाकार आणि कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सांगली इथे रामकथा सुरु आहे. पण काल (5 जानेवारी) रोजी पुण्यातील वाघोली इथे सायंकाळी सात वाजता त्यांना कीर्तनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु सांगली इथली गुरुवारची रामकथा संध्याकाळी पाच वाजता संपणार होती. सांगली ते वाघोली हे अंतर 247 किमी असून त्यांना वाघोलीला पोहोचण्यासाठी साडे पाच तास लागणार होते. कीर्तनासाठी समाधान महाराजांना आणण्याचं चंग वाघोलीतील आयोजकांसह भाविकांनी बांधला होता. त्यामुळे आयोजकांनी थेट हेलिकॉप्टर पाठवून महाराजांना आणण्याची व्यवस्था केली. परिणामी समाधान महाराज शर्मा  अवघ्या 55 मिनिटांत वाघोलीत कीर्तनासाठी संध्याकाळी पोहोचले. हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमस्थळी दाखल होताच महाराजांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमही पार पडला.


संबंधित बातमी


Samadhan Maharaj Sharma : महाराजांसाठी काय पण! पाच तास उशीर होणार असल्याने फक्त 55 मिनिटांत आयोजकांनी हेलिकॉप्टरने कीर्तनासाठी आणले