Farmers On Suniel Shetty : सुनील शेट्टीने (Suniel Shetty) टोमॅटोवर (Tomato) केलेल्या टीकेला उत्तर देत बीडमधील शेतकऱ्यांनी टोमॅटोचे मोफत पार्सल पाठवले आहे. सुनील शेट्टीने टोमॅटोबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे. तसेच टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला दर येत असून सुनील शेट्टी सारख्या कोट्यावधी लोकांच्या पोटात दुखत असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे. परळीतील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संतोष मुंडे यांनी सुनील शेट्टीला मोफत टोमॅटोचे पार्सल पाठवले आहे.
काय म्हटलं होतं सुनील शेट्टीने?
सुपरस्टार असलो म्हणून काय झालं, आम्हाला देखील महागाईचा फटला बसतो मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले असल्याचे वक्तव्य सुनिल शेट्टीने केले होते. त्याच्या या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली. तसेच त्याच्या या वक्तव्यामुळे शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सध्या टोमॅटोचे दर वाढले आहेत, याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावर झाला आहे. मी या दिवसात टोमॅटो खाणे बंद केल्याचं सुनिल शेट्टीनी म्हटलं होतं. त्यावर जोरदार टीका होते आहे.
'सुनील शेट्टीच्या या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील टीका केली होती. अभिनेता सुनील शेट्टींना भाव परवडत नसेल तर टोमॅटो खावू नये. उगाच कांगावा करण्याची गरज नाही', असं म्हणत रविकांत तुपकर यांनी सुनील शेट्टीला उत्तर दिलं होतं.
टोमॅटोची टंचाई निर्माण झाल्याने दरवाढ झाल्याचं चित्र आहे. एकेकाळी कांद्यामुळे सरकार गेल्याचा अनुभव असलेल्या भाजपनं महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय घेतला. टोमॅटो उत्पादनात गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा मिळून 55 टक्क्याहून अधिक वाटा आहे. राज्यात अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, लातूर आणि नागपूर या भागामध्ये टोमॅटोचे उत्पादन अधिक होतं. सध्या याच भागातल्या बाजारात टोमॅटोची आवक अत्यंत कमी झाली आहे. प्रत्येक कॅरेटला दीड ते दोन हजार रुपये भाव मिळल्याचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या टोमॅटोची नासाडी झाली होती. तेव्हा शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याची वेळ आली होती. पण आता टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत असल्याचा पाहायला मिळत आहे.