Beed News : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांचा जाऊ तिथे खाऊ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे या चित्रपटातील विहीर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आणून भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न मकरंद अनासपुरे करतात. त्यामुळे आजही या चित्रपटाची चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात असाच काही प्रकार बीड जिल्ह्यात समोर आल्याने खळबळ उडाली होती. शेतात विहीर नसतांनाही चार वर्षांपूर्वी आपल्या नावावर शासकीय योजनेत विहीर मंजूर झाली आणि त्याचे अनुदान देखील उचलण्यात आल्याचा प्रकार पाहून बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यामधील शेलगाव गंजी येथील शेतकऱ्याला धक्काच बसला होता. त्यामुळे या शेतकऱ्याने थेट औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणात आता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मुभा देत या शेतकऱ्याची याचिका औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढली आहे. 


अधिक माहिती अशी की, बीडच्या केज तालुक्यातील शेलगाव गंजी येथील साहेबराव जाधव हे रहिवासी  आहेत. शेती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान ‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने’अंतर्गत 2016 साली त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याची कागदोपत्री नोंद आहे. एवढच नाही तर विहीर खोदली गेली असून, यासाठी 2 लाख 99  हजार रुपये अनुदान सुद्धा मंजूर झाल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या शेतात कोणतिही विहीर नाही. पण तब्बल चार वर्षांनंतर म्हणजेच 2020  ला हा सर्व गोंधळ साहेबरावांच्या लक्षात आले. हा सर्व प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. 


निवेदनाची कोणतेही दखल घेतली गेली 


कोणतेही कल्पना नसतांना आपल्या शेतात विहीर मंजूर करून पैसे लाटण्यात आल्याचे लक्षात येताच साहेबराव यांनी केजचे गटविकास अधिकारी यांना 4 ऑगस्ट 2022 ला आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना 26 सप्टेंबर 2022 रोजी निवेदन दिले. मात्र,  त्यांच्या निवेदनाची कोणतेही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. दरम्यान या सर्व प्रकरणात सुनावण्या झाल्यावर न्यायालयाने, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मुभा देत या साहेबराव यांची याचिका निकाली काढली आहे. 


रुपेरी पडद्यावरील घटना प्रत्यक्षात घडली? 


जाऊ तिथे खाऊ या चित्रपटामध्ये विहीर चोरीची घटना रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर 'विहीर चोरीला गेली' अशी कथा आपल्याला काल्पनिक वाटतही असेल. मात्र बीडच्या या घटनेनंतर आता 'विहीर चोरीला गेली' असं कोणी म्हणालं, तर तुमच्या भूवया उंचावणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठा गाजावाजा करत सुरु झालेली नगर-आष्टी बहुप्रतिक्षित रेल्वे बंद; 'ही' आहेत कारणं