मुंबई : प्रकृती बरी नसल्याने अजितदादांच्या बीड दौऱ्यावेळी हजर राहू शकत नाही असं सांगणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आदल्या रात्री मात्र मुंबईतील एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली. या फॅशन शोमध्ये मुलीने भाग घेतल्याने धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती. त्याचे फोटो आता समोर आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी बीड दौरा होता. पण आपली तब्येत ठीक नाही, उपचारासाठी मुंबईला जावं लागणार असल्याने आपण अजित पवारांच्या दौऱ्यासाठी उपस्थित राहू शकत नाही असं धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं. याबाबत कुणीही संभ्रम निर्माण करू नये असंही त्यांनी म्हटलं होतं.
'अजितदादांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही' असं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
धनंजय मुंडे फॅशन शोच्या कार्यक्रमात
उपचारासाठी मुंबईला जाणार असल्याचं कारण सांगितलेले धनंजय मुंडे मंगळवारी रात्री एका फॅशन शोच्या कार्यक्रमात दिसले. धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे हिने एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. त्या कार्यक्रमाला रात्री उशिरा धनंजय मुंडे गेट वे ऑफ इंडिया येथे उपस्थित होते.
एकीकडे आजारपणाचं कारण सांगितलं आणि पालकमंत्र्यांच्या आणि स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी हजेरी लावल्याने आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. जिल्ह्यातील विकासकामं, योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस उपस्थित होते.
ही बातमी वाचा: