बीड : मागील काही दिवसांपासून सतत बीड (Beed) जिल्ह्यात पीक विमा घोटाळ्याचे (Crop Insurance Scam) प्रकार समोर येत असतांना, आता आणखी एक असाच घोटाळा समोर आला आहे. बीडमधील माजलगावच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (Chhatrapati Cooperative Sugar Factory) 94 एकर जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून कळंबच्या एका व्यक्तीने पीक विमा भरला आहे. या प्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, या घटनेने जिल्ह्यात आता खळबळ उडाली असून, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातचं हे प्रकार समोर येत आहे. 


बीड जिल्ह्यातल्या माजलगाव येथे असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 94 एकर जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून पीक विमा काढण्यात आला आहे. कळंब येथील एका व्यक्तीने हा पीक विमा भरल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप यांनी बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. सावरगाव परिसरामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 94 एकर जमीन आहे. मात्र, कळंब येथील प्रतापसिंह चौधरी नावाच्या व्यक्तीने याच जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून, कळंबमध्ये एका सीएसटी सेंटरवरून पीक विमा भरला होता. मात्र, ही बाब मोहन जगताप यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रताप सिंह चौधरी आणि अन्य एकाविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.


विशेष म्हणजे, ज्या जमिनीवर हा पीक विमा काढण्यात आला आहे, ती जमीन शासनाच्या रेकॉर्डवर अकृषी म्हणून दाखवण्यात आलेले आहेत. तर, याच जमिनीवर सहकारी बँकेचे कर्ज देखील आहे. तरीही बनावट दस्तऐवज तयार करून या व्यक्तीने पीक विमा भरला होता. त्यामुळे अकृषी जमिनीचा पीक विमा अधिकाऱ्यांनी कसा भरून घेतला? असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. 


बीड जिल्ह्यात बोगस पीक विमा भरणारं रॅकेट 


काही दिवसांपूर्वी देखील बीडच्या नगर परिषदेची जागा गायरान जमीन दाखवून, त्यावर देखील तेलंगणातील एका शेतकऱ्याने पीक विमा भरल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा माजलगाव येथील सहकारी साखर कारखान्याच्या नावावर असलेल्या जमिनीवर पीक विमा भरण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात बोगस पीक विमा भरणारं रॅकेट सक्रिय झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


पीक विमा घोटाळ्याचे कनेक्शन थेट तेलंगणापर्यंत


बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याचे एकामागून एक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे भारतीय पीक विमा कंपनीकडून याची दखल घेण्यात आली असून, त्यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. तर या चौकशीमध्ये काही धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. तेलंगणा राज्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूरपुणे जिल्ह्यातील काही व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा गायरान जमीन दाखवून त्यावर विमा उतरवला असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पीक विमा घोटाळ्याचे कनेक्शन तेलंगणापर्यंत असल्याचे समोर आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crop Insurance Scam : कुठे एमआयडीसीच्या जागेवर, तर कुठे शेतच नसतानाही भरला विमा; कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पीक विमा घोटाळे