बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक जिल्ह्यांचा दौरा केला असून, शुक्रवारी ते बीडच्या दौऱ्यावर होते. मात्र, ठरलेल्या दौऱ्यातील वेळेत उशीर झाल्याने जरांगे यांना बीड (Beed) शहरात पोहचण्यास बराच उशीर झाला. मात्र, असे असतांना मराठा बांधव यांनी त्यांच्या येण्याची वाट पहिली आणि मध्यरात्री दोन वाजता मोठ्या उत्साहात जोरदारपणे जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सभेतून जरांगे यांनी संवाद देखील साधला.
मनोज जारांगे पाटील यांची आरक्षण संवाद यात्रा रात्री दोन वाजता बीड शहरात पोहोचल्यानंतर, मराठा बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर, दोन वाजता देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जरांगे यांचे भाषण ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र जमले होते. यावेळी, आपल्या भाषणामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी आरक्षणावरून छगन भुजबळ आणि सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारवर टीका...
आपल्या भाषणामध्ये जरांगे पाटील म्हणाले की, "मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी सरकार शेवटचा डाव खेळू शकते. आपल्यामध्ये दुसरा गट तयार करण्याचा प्रयत्न सरकारकडून केले जातील. मात्र, अशा कुठल्याही गोष्टीला आपण बळी न पडता आता आरक्षण मिळेपर्यंत एकत्र लढायचं आहे. आपल्या प्रतिष्ठेसाठी राजकीय नेते एका रात्रीत पक्ष बदलून सरकार स्थापन करतात. त्यामुळे आता आपण आपल्या मुलाबाळांच्या प्रतिष्ठेसाठी एकत्र यायचे आहे. सरकारच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता आरक्षण वेळेपर्यंत हा लढा एकत्र करायचा असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
भुजबळांवर टीका...
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, मात्र काही नेते समाजाची दिशाभूल करत आहेत. तर, दुसरीकडे मी मुद्दामून छगन भुजबळ यांच्यावर टीका करत नाही. तर, त्यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो. त्यामुळे, त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करू नये असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ याना नाव न घेता दिला आहे.
14 ऑक्टोबरला अंतरवालीत भव्य सभा...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिल्यावर उपोषण मागे घेतलं. तर, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या मुदतीची सरकारला आठवण करून देण्यासाठी अंतरवाली सराटी गावात 14 ऑक्टोबरला भव्य सभेचं आयोजन करण्यात आले आहे. तब्बल 100 एकरवर ही सभा होणार आहे. यासाठी राज्यभरातून मराठा बांधाव उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्याभरापासून या सभेची तयारी करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: