बीड: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने 1 रुपयात पीक विमा (Crop Insurance) देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता तोच पीक विमा घोटाळ्यांमुळे चर्चेत येऊ लागला आहे. विशेष म्हणजे घोटाळ्याची मालिका थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड जिल्ह्यात समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे चक्क एमआयडीसीची जागा शेत असल्याचे दाखवून 467 एकरचा पीक विमा काढण्यात आला. दुसऱ्या एका घटनेत तर जमीन नसतांना देखील तिघांच्या नावावर विमा काढण्यात आला आहे. त्यामुळे कधीकाळी पीक विमा पॅटर्नमुळे बीड जिल्ह्याची चर्चा झाली होती, मात्र आता त्याच बीडची पीक विमा घोटाळ्यामुळे चर्चा होत आहे. 


मागील काही दिवसांत पीक विम्यात झालेल्या गैरप्रकारचे प्रकार समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यात देखील असेच काही प्रकार समोर आले होते. मात्र, आता बीड जिल्ह्यात पीक विम्यात झालेल्या घोटाळ्यांची मालिकाच समोर येत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात पीक विम्यात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचे स्पष्ट होत आहे. ज्यात कुठे एमआयडीसीच्या जागेवर, तर कुठे शेतच नसतानाही पीक विमा भरण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 


एमआयडीसीच्या जागेवर पीक विमा...


शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने 1 रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली. दरम्यान याचाच फायदा उचलत बीड जिल्ह्यात काहींनी विम्याचा मोबदला लाटण्यासाठी खोटी माहिती भरून पीक विमा भरला असल्याचे समोर येत आहे. ज्यात बीड शहरातील एमआयडीसी परिसरातील 467 एकर जमीन शेती असल्याचे दाखवून पीक विमा भरण्यात आला आहे. तब्बल 180 लोकांच्या नावावर हा विमा भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे विमा ज्यांच्या नावावर उतरवण्यात आले ते सर्व एकाच कुटुंबातील असण्याशा विमा कंपनीला संशय असल्याचं वृत्त 'लोकमत'ने दिलं आहे. 


काही ठिकाणी असेही प्रकार...


बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जाटनांदूर सज्जातर्गत येणाऱ्याा जेधेवाडी व मोरजळवाडीतील तीन शेतकऱ्यांनी 90 हेक्टरचा पीकविमा भरला होता. परंतु चौकशी केली असता महसूल रेकॉर्डला त्या शेतकऱ्यांची नोंदणी नसल्याचे समोर आले. असेच एक प्रकरण वडवणी तालुक्यातही समोर आले आहे. तर 


अधिकचा विमा भरला... 


आष्टी तालुक्यातील कडा येथील एक डॉक्टर व त्याच्या भावाने सोयाबीन व तूर या दोन पिकांसाठी 988 एकरचा पीकविमा उतरवला. परंतु, त्यांना याबाबत पीकविमा कंपनीने विचारणा केली असता हा विमा आम्ही भरला नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आले. आम्हाला केवळ 11 एकर जमीन असल्याचे त्यांनी नमूद करत चुकून अधिक क्षेत्राची नोंद झाली असल्याचे विमा कंपनीला लेखी दिले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


पीक विमा घोटाळा: कागदपत्रे शेतकऱ्यांची, बँक अकाऊंट नंबर मात्र सेतू चालकाचा