बीड: लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक असलेल्या बीडच्या चुरशीच्या लढाईत शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या (BJP) पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. बीड हा आतापर्यंत भाजप आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीडसह (Beed Lok Sabha Election 2024) मराठवाड्यातील राजकीय समीकरणे 180 अंशांच्या कोनात बदलली होती. पंकजा मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील महायुतीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते. मात्र, पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातील पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
या सगळ्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) लागल्यानंतर बीड जिल्ह्यात सातत्याने तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील एक-एक शहर बंद ठेवून निषेध व्यक्त केला जात आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबतची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रथम पाथर्डी शहर बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर शिरुर-कासारमध्ये बंद पाळण्यात आला होता. यानंतर परळी आणि वडवणी भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यानंतर आता बुधवारी केज बंदची (Kej Taluka) हाक देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक शहरात टप्प्याटप्प्याने पाळण्यात येणाऱ्या या बंद आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीदरम्या निर्माण झालेला तणाव अद्याप निवळलेला नाही.
देशात रविवारी एनडीए सरकार स्थापन झाले. यानंतर मंत्र्यांचा शपथविधी होऊन त्यांनी पदभार स्वीकारुन कामालाही सुरुवात केली. मात्र, बीड जिल्ह्यातील तणाव काही केल्या निवळायला तयार नाही. मध्यंतरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरुन बीडकरांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या आवाहनाचा फारसा फायदा झालेला नाही. सोशल मीडियावर सातत्याने वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत आहेत. पोलिसांकडून याविरोधात कारवाई केली जात असली तरी कोणतीही ठोस कारवाई किंवा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी समोर येऊन आपापल्या समर्थकांना शांत राहण्याच आवाहन करावे, जेणेकरुन बीड जिल्ह्यातील हा तणाव निवळेल, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.
आणखी वाचा
बीड जिल्ह्यात सोशल मीडिया अंडर पोलीस सर्व्हेलन्स; आक्षेपार्ह पोस्ट नाही, ग्रुप ॲडमिनवरही करडी नजर
कधी वडवणी बंद तर कधी परळी बंद, लोकसभेच्या निकालानंतर बीड जिल्ह्यातील तणाव कायम