Beed News: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पेढा खाल्ल्याने एकाच गावातील 15 लोकांना विषबाधा झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv District) तुळजापुरहून येताना भाविकांनी कुंथलगिरी येथून पेढा आणला आणि तो गावभर वाटला होता. मात्र तोच पेढा खाल्ल्याने गावातील लहान मुलांसह मोठ्या 15 माणसांना उलटी, मळमळचा त्रास सुरू झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान त्रास अधिक होत असल्याने या सर्वांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून, हे सर्व रुग्ण बीड तालुक्यातील आहेर वडगावचे असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथील क्जाही गावकरी तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवीचं दर्शन झाल्यावर घरी परत येताना या भाविकांनी धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरी येथून पेढा विकत घेतला. दरम्यान गावात आल्यावर गावातील अनेकांना हाच पेढा प्रसाद म्हणून दिला. देवाचा प्रसाद म्हणून अनेकांनी खाल्ला होता. विशेष म्हणजे लहान मुलांसह मोठ्या व्यतींनीही तो चवीने खाल्ला होता. मात्र पेढा खाल्ल्यावर शनिवारी दुपारनंतर अचानक या सर्वांना उलटी, मळमळ, जुलाबासारखा त्रास सुरू झाला. अधिक त्रास होत असल्याने सुरवातीला दुपारी साडेतीन वाजता दोन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर इतरांना देखील त्रास वाढला असल्याने रात्री आठ वाजेपर्यंत 15 जण बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. तर त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या सर्वावर डॉ. रविकांत चौधरी, डॉ. राजश्री शिंदे, डॉ. शंकर काशीद, डॉ. अनंत मुळे यांच्यासह परिचारिका, ब्रदर, कक्षसेवकांनी उपचार केले असून, या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कुंथलगिरीचा पेढा महागात पडला...
तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जाणारे अनेक भाविक कुंथलगिरीचा पेढा विकत घेतात. चवीने सुंदर असलेला हा पेढा राज्यभरात प्रसिद्ध आहे. अनेक भाविक प्रसाद म्हणून देखील कुंथलगिरीचा पेढा आणतात. मात्र हाच कुंथलगिरीचा पेढा आहेर वडगाव येथील गावकऱ्यांना महागात पडला आहे. या गावकऱ्यांनी तूळजापूर येथील देवीचं दर्शन घेतल्यावर परत येताना कुंथलगिरीचा पेढा विकत घेतला. तर प्रसाद म्हणून गावभर वाटला देखील. मात्र हाच पेढा खाल्ल्यावर गावातील अनेकांना विषबाधा झाली. उलटी, मळमळ, जुलाबासारखा त्रास सुरू झाला. शेवटी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे कुंथलगिरीचा पेढा भाविकांसह गावकऱ्यांना महागात पडला असल्याची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
नांदेडमध्ये 57 जणांना पाणीपुरीतून विषबाधा; लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग