नांदेड: जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 57 जणांना विषबाधा झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील चाभरा गावात हा प्रकार घडला असून, पाणीपुरी खाल्लेल्या गावकऱ्यांना मळमळ आणि उलट्या, अतिसार (Nanded Food Adulteration) सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांना त्रास सुरू झाल्यानंतर तात्काळ चाभरा, अर्धापूर आणि नांदेड येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.


दरम्यान, याबाबत अधिक माहिती अशी की, चाभरा गावातील गावकऱ्यांनी 14 एप्रिल रोजी पाणीपुरी खाल्ली होती. मात्र दुसऱ्या दिवशी 15 एप्रिल रोजी सकाळी गावातील अनेकांना त्रास सुरू झाला. गावकऱ्यांना मळमळ आणि उलट्या होण्यास सुरुवात झाल्याने खळबळ उडाली. ज्यात काही जणांना उलट्या व अतिसार सुरू झाल्याने गावकऱ्यांची धावपळ उडाली. पाणीपुरी खाल्लेल्या पैकी अनेकांना उलट्या व अतिसाराचे प्रमाण वाढल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यात काहींना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून, दोघांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या सर्व लोकांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


Nanded Food Adulteration: पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले


पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झालेल्यांची संख्या मोठी असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यात लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. तर घटनेची गंभीरता लक्षात घेत सकाळीच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाभरा गावात जाऊन पाहणी केली. सोबतच पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीकडून पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर चाभरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 47, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात 08 आणि नांदेड येथे खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार करण्यात येत आहे. ज्यात 11 लहान मुले असून,  46 मोठ्या व्यक्तीचा समावेश आहे. तसेच यात महिला व पुरुषही यांचा देखील समावेश आहे.


यांनी केली गावात पाहणी...


जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. संदेश कदम, डॉ. जनार्धन टारफे, डॉ. मुस्तपुरे, आरोग्य सेविका टरके, सतीश जाधव आदींनी गावातील सर्व विषबाधित रुग्णांची तपासणी केली.