बीड : संत शिरोमणी मनमत स्वामी महाराजांची संजीवनी समाधी असलेल्या बीड मधील क्षेत्र कपिलधार येथील कार्तिकी पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे. पौर्णिमेनिमित्त कपिलधार येथे हस्ते महापूजा करण्यात येते. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातून भाविक दाखल होत असतात.
कपिलधार येथे यंदा 6 ते 8 नोव्हेंबरदरम्यान कार्तिक पौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. आज या यात्रेचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. वीरशैव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा यात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराजांनी यात्रोत्सवात दिंडीची परंपरा सुरू केली.
महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक या यात्रेसाठी येतात. या यात्रेमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान कमिटीकडून महिनाभर याची पूर्वतयारी सुरू असते. या सर्व गोष्टी लक्षात घेता बीड प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली आहे.
या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि भोजनाची सोय करण्यात येते. तसेच यात्रोत्सव काळात बीड आणि नेकनूर येथील वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका व अग्निशामक दल तैनात राहणार आहे. यंदा जवळपास 60 हून अधिक दिंड्या दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्रोत्सवासाठी जिल्हाभरातून 90 हून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली असून तीनशेवर पोलिस बंदोबस्तासाठी असणार आहेत. यात्रेसाठी एसटी परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील 10, आष्टी 8, अंबाजोगाई 15 अशा प्रकारे एकूण 90 बसेस ची व्यवस्था कपिलधार यात्रोत्सवासाठी करण्यात आली आहे.
कपिलधार यात्रेच्या काळात 700 हून अधिक विविध प्रकारची दुकाने आणि स्टॉल लागले आहेत. लाखो भाविक तीन दिवस मुक्कामी राहात असल्याने या ठिकाणी 22 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. धबधब्यात रॅलिंग आणि पाय घसरु नये म्हणून आतील बाजूस विशिष्ट प्रकारचे रंगकाम करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली आहे.
कपिलधार तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री अतुल सावे म्हणाले. कपिलधार हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने देखील विकास करण्याचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला असून त्यासंबंधी वेगवेगळे विकास कामे लवकरच सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.