बीड: जिल्ह्यातील माजलगाव धरणात (Beed Majalgaon Dam) बुडालेल्या डॉ. फपाळ यांचा शोध घेताना कोल्हापूरच्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या जवानाच्या मृत्यूनंतर डॉ. फपाळ यांचा मृतदेह आज सांयकाळी 5 वाजता सापडला. डॉ. फपाळ यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथील केडीआरएफचे पथक  (KDRF) माजलगाव धरणाच्या जलाशयात आज सकाळी दाखल झालं होतं. दरम्यान, डॉ. दत्ता फपाळ यांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करणारा एक केडीआरएफचा जवान दुपारी पाण्यात बुडून मृत्यू पावला आहे.


बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील तेलगाव येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. दत्ता फपाळ हे माजलगाव पोहत होते. सकाळी आठ वाजता पाण्याचा अंदाज न आल्याने डॉक्टर फपाळ हे पाण्यामध्येच बेपत्ता झाले.. डॉक्टर फपाळ सोबत इतर त्यांचे मित्र होते. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि एकच धावपळ सुरू झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्यामध्ये उड्या घेतल्या आणि डॉ. दत्ता फपाळ यांचा शोध सुरू केला. पण त्यांना यामध्ये यश आलं नाही.


माजलगाव नगरपरिषद, त्यानंतर परळी नगरपालिका आणि बीड वरुन आपत्ती व्यवस्थापनाची (BEED) एक टीम तात्काळ माजलगाव धरणावरती (Beed Majalgaon Dam) आली. अनेकांनी दिवसभर शोधून सुद्धा डॉक्टर फपाळ हे आढळून आले नाहीत आणि त्यामुळे बीडच्या प्रशासनाने अखेर कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला (KDRF) संपर्क केला आणि कोल्हापूरहून आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानासह एक टीम आज सकाळी माजलगाव धरणावर दाखल झाली.


बचाव पथकाचे शोधकार्य सुरु असतानाच पथकातील दोन जवान पाण्यात बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. यातील शुभम काटकर या जवानास बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र राजू मोरे हा जवान मासेमारीच्या जाळ्यात अडकून गतप्राण झाला. बचाव पथकातील इतर जवान व स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने जवानाचा शोध घेण्यात आला. विशेषतः स्थानिक महिला मच्छिमारांनी टाकलेल्या गळाला केडीआरएफच्या जवानाचा शोध लागला. यानंतर जवानाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले.


कोल्हापूरच्या एका जवानाच्या बलिदानानंतरही डॉ. फपाळ यांच्या प्रेताचे शोधकार्य स्थानिक भोई समाजाचे तरुण आणि बचाव पथकातील जवानांनी शोधकार्य सुरुच ठेवले. तब्बल 32 तासांच्या अथक प्रयत्नांतून आणि एका जवानाचा बळी गेल्यानंतर सांयकाळी 5 वाजता डॉ. दत्ता फपाळ यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.