Beed Crime : बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणामध्ये बुडालेल्या डॉक्टरचा शोध घेताना कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवानही बुडाला आहे. बुडालेल्या जवानाचे विजय मोरे असे नाव असून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, धरणात बुडालेल्या डॉक्टरचा काल मृत्यू झाला आहे.
काल सकाळी माजलगाव धरणात पोहायला गेलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा मृतदेह 24 तासानंतरही बचाव पथकाला मिळालेला नाही. मात्र या बचावकार्यादरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली. एनडीआरएफच्या कोल्हापूर येथील बचाव पथकातील कर्मचारी राजू मोरे हे देखील मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकले.
बचाव कार्य करत असताना ते ऑक्सिजन सिलींडरसह पाण्यात उतरले होते. मात्र मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात ते अडकल्याने त्यांना ओढून बाहेर काढत असताना त्यांचा ऑक्सिजन सिलिंडर निसटून वर आला. मात्र, मोरे हे अद्यापही पाण्याखालीच आहेत. दुसऱ्या एका बुडालेल्या कर्मचाऱ्याला महत्प्रयासांनी बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून आली. या टीमने शोधकार्य सुरू केले. मात्र, धरणात मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकून टीममधील दोन सदस्य पाण्याखाली अडकले. त्यांना बाहेर काढताना झालेल्या खेचाखेचीत राजू मोरे यांचा ऑक्सिजन सिलिंडर निसटून वर आला. त्यांचाही शोध बचाव पथकातील कर्मचारी घेत आहेत. दुसऱ्या एका शुभम काटकर या कर्मचाऱ्याला 15 मिनिटांनी बीडच्या बचाव पथकाने वर काढले. त्याच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत .
इतर महत्वाच्या बातम्या