Beed News : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. पण मराठवाड्यातील बीड (Beed) जिल्ह्यात मात्र पावसाने पाठ फिरवली असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अर्धा पावसाळा संपला तरी देखील बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागील दिड महिन्यांपासून जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही.  जिल्ह्यातील 143 प्रकल्पापैकी 36 प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर 63 प्रकल्पातील पाणी जोत्याखाली आले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये फक्त  13 टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. 


विशेष म्हणजे  बीड शहराला पाणीपुरवठा महत्त्वाच्या करणाऱ्या दोन प्रकल्पांमध्येही पाणीसाठा अतिशय कमी झाला आहे.  माजलगाव धरणात फक्त 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर  बिंदुसरा प्रकल्पामध्येही केवळ  23 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. मुंबई, पुणे,कोकण, यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं. पण बीडमध्ये मात्र पावसाने अजूनही दमदार हजेरी लावली नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता बीडमधील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे. तसेच जर येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर बीड जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 


राज्यात मुसळधार पण बीड मात्र कोरडेठाक


राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यामधील धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर  वाढ झाली आहे. पण दुरसरीकडे बीड जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे अद्यारही बीडकर पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच बीडमधील अनेक छोट्या मोठ्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे बीडमध्ये सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. 


शेतकरी पुन्हा चिंतेत 


बीडमध्ये कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. पण पावसाने थोडी उसंत घेत बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पेरणी झाल्यानंतर मुबलक प्रमाणात पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. 


एकीकडे पावसाचं संकट तर दुसरीकडे पेरण्या झाल्या असल्या तरी उगवून आलेलं सोयाबीन आणि कापसावर मोठ्या प्रमाणात गोगलागायीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकं उगवून येण्याच्या आधीच गोगलगायी पिक फस्त करत असल्याचं चित्र सध्या बीडमध्ये आहे. त्यामुळे बीडमधील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं असल्याचं म्हटलं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Agriculture News : आधीच पावसाची तूट त्यात पिकांवर गोगलगायचा प्रादुर्भाव, बीड जिल्ह्यातील बळीराजा संकटात