मुंबई : नोकऱ्या महाराष्ट्रात आणि भरती मात्र परप्रांतियांची केली जातेय, रेल्वे कॉर्पोरेशनच्या भरतीमध्ये एकही मराठी मुलगा नाही, इन्कम टॅक्स विभागातील (Income Tax Mumbai Job) 1200 पैकी फक्त 3 पदं मराठी युवकांना मिळाली आहेत, त्यामुळे मराठी युवकांवर हा अन्याय असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला आहे. शासकीय नोकरी महाराष्ट्रात, पण त्यामध्ये एक टक्काही मराठी तरूणांना संधी नसल्याचं स्पष्ट झालं आहे असं अरविंद सावंत म्हणाले. 


महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकरीत, रेल्वे भरतीत 1 टक्का सुद्धा मराठी मुलांना स्थान नाही. मुंबईत यांना मराठी मुले मिळत नाहीत का? केंद्र सरकारला मुंबईत उत्तर भारतीय कार्यालयं थाटायची आहेत का? असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला. ते म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये नोकरीत मराठी माणसाला भूमीपुत्राला प्राधान्य द्या असं आम्ही आधीपासून म्हणतोय. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने एक जाहिरात दिली. ज्यामध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली जाणार होती. त्यासाठी 15 जागा भरल्या जाणार होत्या. 20 मुले यासाठी आली आणि त्यापैकी 12 जागा भरल्या. या सगळ्या जागा बघा, यातला एकही मुलगा मुंबईचा नाही, महाराष्ट्रचा नाही. तुम्हाला एकही माणूस महाराष्ट्रचा मिळाला नाही?


इन्कम टॅक्स मध्ये 1200 पैकी 3 मराठी युवक


इन्कम टॅक विभागातसुद्धा हेच सुरू आहे. या विभागात 1200 मुलं भरण्यात आली, त्यापैकी फक्त 3 मुलं ही मराठी आहेत. त्यामुळे भूमीपुत्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचा काम केलं जातंय. याच्या विरोधात मी कॉर्पोरेशनला पत्र दिलं आहे. यामध्ये एकही मुलगा मराठी का नाही असा प्रश्न विचारला आहे.  


स्थानिक भाषा अवगत नसलेल्या लोकांना तुम्ही मुंबई रेल्वेमध्ये भरती करताय, ही परप्रांतियांना केंद्र सरकारने दिलेली देणगी आहे. राज्यातले रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री आहेत, पण त्यांना किती अधिकार आहे माहीत नाही 


शिवाजी महाराजांचा पुतळा सीएमएमटी स्टेशन मुख्यालयसमोर बसवण्याची मागणी मान्य केली आहे, पण अजूनही तो पुतळा बसवण्यात आला नाही. असं धोरण आमच्याकडे नाही हे रेल्वेने उत्तर दिलं. महाराष्ट्रवर कसा अन्याय सुरू आहे याचं हे चित्र आहे. 


शिंदेंना कोणता ब्रँड हवाय त्यांनाच माहित


राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, लोकांना एंटरटेनमेंट पाहायला आवडतं. द्वेषाची जी बीजं भाजपने पेरली ती काही जण चाखत आहेत. त्यात आता हेसुद्धा तिकडे जात असतील. लोक आता भूलणार नाहीत. आधी लोक मनसेला भूलले होते, त्यावेळी काही आमदार निवडूण आले, नंतर मात्र लोक त्यांच्याकडे गेले नाहीत. शिंदेंना ठाकरे ब्रँड हवाय की आणखी कोणता ब्रँड हवाय हे त्यांनाच माहिती. त्यांच्या पालनकर्त्यांना कोणता ब्रँड हवा आहे? त्यानुसार ते वाटचाल करतील. 


ही बातमी वाचा: