Beed Politics : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची (BJP Lok Sabha Candidate List) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला असून, ज्यात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचा देखील समावेश आहे. प्रीतम मुंडे यांना डावलून त्यांच्या ज्येष्ठ भगिनी तथा माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडेंचं काय? अशी देखील चर्चा सुरु झाली आहे. तर, प्रीतम मुंडे यांना विधानसभेत (Assembly) संधी दिली जाणार का? याबाबत देखील चर्चा आहे.
प्रीतम मुंडे यांना डावलून बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. विशेष म्हणजे भाजपकडून झैर करण्यात आलेल्या उमेदवारीत देखील प्रत्यक्षात प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे सलग 10 वर्ष बीडच्या खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांच्याबाबत आता भाजप कोणता निर्णय घेणार हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे. मुंडे कुटुंबाची बीडच्या राजकारणात मोठी पकड आहे. पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे प्रीतम मुंडे देखील मागील 10 वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा विचार पक्षाकडून केला जाणार का? अशी चर्चा मुंडे समर्थकांमध्ये आहे.
पंकजा मुंडेंची नाराजी दूर झाली का?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव केला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे यांना सतत पक्षाकडून डावलण्यात आल्याचा आरोप झाला. प्रत्येक विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत पंकजा यांच्या नावाची चर्चा असायची. मात्र, त्यांना उमेदवारी काही मिळाली नाही. अनेकदा पंकजा मुंडे यांनी देखील आपली नाराजी अप्रत्यक्षपणे सभांमधून बोलावून दाखवली होती. असे असतांना आता लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देऊन भाजपकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला का? आणि पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली का? अशीही चर्चा पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप लढत होणार?
महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून अजूनही बीड लोकसभा मतदारसंघ कोणता पक्ष लढवणार याबाबत अधिकृतरीत्या माहिती समोर आलेली नाही. बीडचा राजकीय इतिहास पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच संघर्ष कायम या मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. त्यामुळे यंदाही अशीच काही लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण असणार हे देखील पाहणं महत्वाचे असणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना एकूण 6 लाख 78 हजार 175 मते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना 5 लाख 9 हजार 108 मते मिळाली होती. त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे 91 हजार 972 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या :