बीड: जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बनावट औषध साठा होत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याच्या तपासाची पाळेमुळे भिवंडीपर्यंत पोहचली आहेत. भिवंडीतून बनावट औषध साठा पुरविणाऱ्या इसमांविरोधात बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीतील नारपोली येथील मे.ॲक्वेटीस बायोटेक प्रा.लि.कंपनीचे संचालक मिहीर त्रिवेदी आणि द्विती सुमित त्रिवेदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बीड येथील बनावट औषध पुरवठा प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात बनावट औषधांची तपासणी बीड येथील शासकीय औषध निरीक्षकांनी केली. त्यामध्ये मेसर्स उत्तराखंड येथील म्रीस्टल फॉर्मुलेशन या अस्तित्वात नसलेल्या बनावट कंपनी कडून उत्पादित केलेल्या अझीमसीम 500 टॅबलेट चा नमुना चाचणीसाठी घेण्यात आला होता. 


मुंबई येथील शासकीय औषध परीक्षण प्रयोगशाळेत हे औषध बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बीड येथील औषध निरीक्षक यांनी तपासास सुरवात केली असता ई निवेदेद्वारे 25 हजार 900 रुपयांची औषधे  कोल्हापूर येथील मे. विशाल एन्टरप्राईजेस यांनी औषध पुरवठा केल्याचे स्पष्ट झाले.


कोल्हापूरच्या कंपनीकडून औषधे खरेदी विक्रीबाबत कागदपत्रांची चौकशी केली असता या औषधांचा पुरवठा भिवंडी नारपोली येथील मिहीर त्रिवेदी व द्विती सुमित त्रिवेदी यांच्या मालकीच्या मे.ॲक्वेटीस बायोटेक प्रा.लि.आणि सुरत दिंडोली येथील मे. फार्मासिक्स बायोटेक यांच्याकडून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
        
भिवंडीतील कंपनी मालकांनी सदरचा औषध पुरवठा हा मे.काबीज जेनेरिक हाउस मिरा रोड, ठाणे यांचेकडून खरेदी करून कोल्हापूर येथील विशाल एन्टरप्राईजेस यांना वितरीत केला होता. तर सुरत येथील मे. फार्मासिक्स बायोटेक या कंपनीने देखील बनावट औषध साठा भिवंडी येथील मे.ॲक्वेटीस बायोटेक प्रा.ली.कंपनी यांच्याकडून घेऊन कोल्हापूर येथील मे. विशाल एन्टरप्राईजेस या कंपनीकडे दिल्याचे तपासात समोर आले आहे. 
       
पैसे कमावण्याच्या उद्देशाने मालाची आणि कंपन्यांची हेराफेरी करून हा बनावट औषधसाठा वितरित होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या तपासात मीरा भाईंदरच्या कंपनी मालकाला या आधीच बनावट औषध प्रकरणात अटक केल्याचे तपासात समोर आले आहे. मिरा भाईंदर कंपनीने डेहराडूनच्या कंपनीकडून औषध खरेदी केल्याचे सांगितले होते. मात्र त्या ठिकाणी अशी कोणतीही औषध कंपपनी अस्तित्वात नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या बनावट औषधाचे काळाबाजार करणारे मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे.