बीड : काही दिवसापूर्वी बीडमध्ये (Beed News) झालेल्या सायबर फ्रॉडचे (Cyber Fraud) थेट पाकिस्तानात कनेक्शन (Pakistan Connection) असल्याची एक धक्कादायक माहिती बीडच्या सायबर विभागाने केलेल्या कारवाईत उघड झाली आहे. बीड शहरात झमझम कॉलनीत राहणारे मोहम्मद अब्दुल रहीम यांना कोण बनेगा करोडपतीची एक लिंक पाठवून त्यांची फसवणूक करून त्यांच्या खात्यावरून 29 लाख 23 हजार रुपय परस्पर काढून घेण्यात आले होते. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 3 मार्च 2022 रोजी बीडच्या शहर पोलीस ठाण्यात सायबर भामट्यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा तपास बीडच्या सायबर सेलकडे देण्यात आला
या प्रकरणाचा तपास करत असताना ऑनलाईन फसवणूक करणारे हे भामटे बिहारमध्ये (Bihar) असल्याची माहिती पोलिसांना तांत्रिक तपासात मिळाली आणि त्यांचा शोध घेण्यासाठी बीडच्या सायबर विभागाचे काही पोलीस अधिकारी बिहारमध्ये गेले. आठ दिवस बिहारमध्ये या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी नेहाल जमाल अख्तर आणि जुबेर अब्दुल हकीम या दोन आरोपींना अटक केली. आरोपींची चौकशी केली असता ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) करून मिळवलेले पैसे थेट पाकिस्तान, अमेरिका आणि दुबईसह सौदी अरेबियात पाठवत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. यामध्ये तब्बल 12 कोटी रुपयांच्या बँक व्यवहाराचा तपशील देखील पोलिसांच्या हाती लागला आहे.
विशेष म्हणजे फ्रॉड करून मिळवलेला हा पैसा वस्तूच्या स्वरूपात पाकिस्तानात (Pakistan) जात होता. भारतातून एक्सपोर्ट होणारा सामान त्याच्या बदल्यात व्यापाऱ्यांना हा पैसा दिला जायचा पोलिसांना याची भणक लागू नये म्हणून अशा वेगवेगळ्या युक्त्या या आरोपींनी वापरल्या. मात्र बीड पोलिसांच्या सायबर सेलच्या (Beed Police Cyber Police) अधिकाऱ्यांनी बिहारमध्ये जाऊन या प्रकरणाचा छडा लावला आहे. बीडनंतर बिहार या ठिकाणाहून थेट पाकिस्तानच कनेक्शन उघड झाल्यानंतर पोलीस वेगवेगळ्या मार्गाने तपास करत आहेत. हा फक्त सायबर फ्रॉड आहे की, इतर कारणासाठी या पैशाचा वापर केला जात होता का याचा देखील तपासाचा पोलीस करत आहेत.