बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर लाखो रुपयांच्या भृष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा काका पुतण्याचा वाद रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळतय
बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नवगण शिक्षण संस्था असून याच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कर्मचार्यांकडून सक्तीने एका महिन्याचा पगार वसूल करून मोठा भ्रष्टाचार केल्याने या कर्मचार्यांवर अन्याय झालेला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला असून याची रितसर चौकशी करण्यात यावी व अन्याय झालेल्या या कर्मचार्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा तसेच अन्याय झालेल्या कर्मचार्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची आर्थिक व मानसिक नुकसानीपासून सुटका करण्याचे आश्वासन संदीप क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे
आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेले आरोप
नवगण शिक्षण संस्थेने प्रशासन चालवण्यासाठी एक असंवैधानिक समिती स्थापन केली असून समितीमध्ये डॉ.एस.एल.गुट्टे, डॉ.एस.एस.जाधव, डॉ.व्ही.टी.देशमाने आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी बीड येथील सौ.के.एस.के.महाविद्यालयात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असूनही महाविद्यालयात न थांबता दररोज वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थेअंतर्गत येणार्या महाविद्यालयांना तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दररोज भेटी देऊन तेथील कर्मचार्यांवर दबाव आणून प्रतिवर्षी मार्च एंडींग म्हणून एक पगार सक्तीने, दम देऊन वसूल करतात. या प्रकारामुळे संस्थेतील सर्व कर्मचारी भयभीत झाले असून सदरील समिती प्रत्येक दिवशी एका महाविद्यालयाला भेट देऊन प्रत्येक कर्मचार्याला स्वतंत्ररित्या बोलवून पैशाची मागणी करत आहे.
आपण पैसे न दिल्यास आपली बदली करण्यात येईल, पदोन्नती रोखण्यात येईल, वेतनवाढी रोखण्यात येतील, रजा मंजुर करण्यात येणार नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे कर्मचार्यांचे खच्चीकरण होत असून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. तसेच युजीसीकडून मिळणार्या विविध अनुदानात अपहार होत असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली असून कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.