बीड: जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचे प्रसूतीसाठी सिजर करताना तिच्या आतड्याला छिद्र पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचा पोट फुलत असल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर महिलेचे  नातेवाईक संतप्त झाले असून, दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तर, या प्रकरणात चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली आहे. 


अधिक माहितीनुसार, बीड तालुक्यातील एक महिला 9 नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तर, 10 नोव्हेंबर रोजी रोजी मध्यरात्री दीड वाजता तिला सिझरसाठी घेण्यात आले. पण, याचवेळी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेच्या आतड्याला जखम झाली. धक्कादायक म्हणजे या महिलेला दुसऱ्या दिवशी त्रास सुरु झाला आणि पोट देखील फुगले होते. त्यामुळे, त्रास अधिक वाढल्याने महिलेच्या नातेवाईकांनी तिला तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या आतड्याला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांना देखील धक्का बसला. त्यामुळे नातेवाईक काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. 


चौकशी समिती नियुक्त 


महिलेला अधिकचा त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तर, सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या आतड्याला छिद्र पडल्याचे कळताच नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेतली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला त्रास झाला, शिवाय खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे व पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावर डॉ. बडे यांनी चौकशी समितीही नियुक्त केली. 


जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी...


दरम्यान घडलेल्या सर्व प्रकरणाची चौकशीसाठी मंगळवारी नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी मोठी गर्दी जमा झाल्याने बीड शहर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. निष्काळजी करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, या मागणीवर नातेवाईक ठाम होते. नातवाईकांची आक्रमक भूमिका पाहता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे यांच्याकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Foods For Normal Delivery : गरोदरपणात 'या' गोष्टी जरूर खाव्यात, आई आणि मूल दोघांकरता आहेत फायदेशीर