Beed Crime : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे पॅलेस्टाईन (Palestine) व गाझा पट्टीतील (Gaza Strip) नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली, हिमायत फाऊंडेशनच्या माध्यमातून सोशल मीडियावरून निधी जमा करण्यात येत होता. मात्र, जमा झालेला निधी (Fund) स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दहशतवाद विरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत स्वतः पुढाकार घेऊन गेवराई येथील कुरेशी शाहरुख उर्फ छोटू मिया याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
शाहरुख उर्फ छोटूमिया कुरेशी (रा. राजगली, गेवराई, जि. बीड) याने हिमायत फाऊंडेशन या एनजीओला परदेशातील उद्दिष्टांसाठी काम करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही, सोशल मीडियावरून गेवराई शहरातील नागरिकांचा विश्वास संपादन करत गाझामधील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले. मात्र, फाऊंडेशनच्या अधिकृत बँक खात्यावर देणगी न घेता, कुरेशीने स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांचा QR कोड वापरून निधी जमा केला आणि लाखोंचा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. परिणामी, अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
मदतीच्या नावाखाली केला निधी जमा
सध्या देशभरात पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहीमा सुरू असतानाच हिमायत फाऊंडेशन या एनजीओला परदेशात काम करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही मदतीच्या नावाखाली निधी जमा करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथकांनी दहशतवादाशी संबंधित अनेक ‘मोड्युल्स’चा पर्दाफाश करून त्यांना उद्ध्वस्त केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची भरती करणाऱ्या दहशतवादी संघटनांचे भयावह वास्तव समोर येत आहे. या संघटना आपल्या विध्वंसक कारवायांसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत आहेत. याशिवाय, डार्क वेबचा वापर करून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, शस्त्रास्त्रांची खरेदी आणि आर्थिक व्यवहार घडवले जात आहेत. डार्क वेबमुळे निर्माण होणारे आव्हान आज जगभरातील सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या