बीड : शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी बँकेत गेलेल्या एका तरुणीचा बीड (Beed) परळी रोडवर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही मुलगी वडिलांसोबत बँकेत शैक्षणिक कर्जासाठी आली होती. यावेळी परत जाताना मंजिरी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जोराची धडक दिली आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला. स्वाती शेषनारायण गोंडे (वय 22 वर्षे) असे तरुणीचं नाव आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घेण्याची विनंती करणारे पत्र मराठा समाज बांधवांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
स्वातीचा एम. फार्मसीसाठी नंबर लागला होता. मात्र, कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्याने पैशांची जुळवाजुळव होत नव्हती. त्यामुळे शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा स्वातीने निर्णय घेतला होता. त्यामुळे ती वडिलांसोबत शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी बँकेत गेली होती. बँकेत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वडिलांसोबत घरी येत असताना ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ज्यात स्वातीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.
पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली...
अधिक माहितीनुसार, बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील स्वाती शेषनारायण गोंडे या तरुणीचा एम. फार्मसीसाठी सातारा येथे नंबर लागला होता. तिने आठ दिवसांपूर्वीच अॅडमिशन घेतले होते. परंतु वडिलांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्यामुळे घरची परिस्थिती आर्थिक बेताची होती. त्यामुळे स्वाती वडवणी येथील बँकेत शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी गेली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी शैक्षणिक कागदपत्रे तपासल्यानंतर घर व शेतीची पाहणी करण्यासाठी निघाले होते. त्यामुळे, स्वाती वडिलांसोबत दुचाकीवरून घरी निघाली. दरम्यान, बीड- परळी महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात स्वाती गंभीर जखमी झाली होती. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
स्वातीचे मेडिकलचे स्वप्न अपूर्णचं...
वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील स्वाती गोंडे लहानपणापासूनच अभ्यासत हुशार होती. मोठ्या कष्टाने तिने आपले शिक्षण पूर्ण केल्यावर तिचा एम. फार्मसीसाठी सातारा येथे नंबर लागला होता. मेडिकल क्षेत्रात तिला यश मिळवायचे होते. यासाठी तिने प्रचंड मेहनत देखील घेतली होती. मात्र, घरची परिस्थिती आर्थिक बेताची असल्याने तिला पुढील शिक्षण घेणं अवघड झाले होते. त्यामुळे तिने बँकेतून शैक्षणिक कर्ज घेऊन, पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. यासाठीच ती आपल्या वडिलांसोबत बँकेत गेली होती. परंतु, घरी परत येत असतानाच तिचा अपघात झाला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे स्वातीचे मेडिकलचे स्वप्न अपूर्ण राहिले.
इतर महत्वाच्या बातम्या: