Manoj Jarange on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता मराठा समाजाला (Maratha Reservation) ग्राह्य आणि गृहीत धरू नये, असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनीच दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे काही वर्षांपूर्वी नारायणगडावर एका उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी याच नारायण गडावरून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मराठा बांधवांना दिला होता, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी काल (मंगळवारी) बीड तालुक्यात असलेल्या नारायण गडावर जाऊन नगद नारायण महाराजांचं दर्शन घेतलं त्यावेळी ते बोलत होते. 


मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे काही वर्षांपूर्वी नारायणगडावर एका उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी याच नारायण गडावरून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मराठा बांधवांना दिला होता. मात्र मराठा समाजाला अद्यापही टिकणारं आरक्षण मिळालं नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मतदानासाठी आता मराठा समाजाला ग्राह्य आणि गृहीत धरू नये." 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात : मनोज जरांगे पाटील 


"मराठा समाजानं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षावर देखील आता विश्वास टाकला असून फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, असा विश्वास आम्हाला वाटत आहे. गेल्या 75 वर्षांपासून या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना मोठं करण्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी मोठं योगदान दिलं आहे आणि आता या तरुणांसाठी काहीतरी करण्याची वेळ सरकारवर आली असताना, सरकारनं जर आरक्षण दिलं नाहीतर मराठा समाज या कुठल्याही नेत्याच्या पाठीशी उभा राहणार नाही.", असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी यावेळी बोलताना दिला आहे. 


मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जातेय : मनोज जरांगे पाटील 


मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी म्हणून जरांगे यांनी मोठे आंदोलन भरलं असून या आंदोलनानंतर आता ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला आहे, कारण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, अशी मागणी ओबीसी समाजाकडून होत आहे. याबाबत बोलताना जरांगे यांनी सांगितलं की, मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. यापूर्वीच 75 टक्के मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षणाचा लाभ घेत आहे. यामध्ये विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा देखील समावेश आहे, त्यामुळे आता उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही हे आंदोलन उभं केलं आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही.", असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज बीड तालुक्या असलेल्या नारायण गडावर जाऊन नगद नारायण महाराजांचे दर्शन घेतलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव नारायण गडावर उपस्थित होते, तर याच ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यामध्ये आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज आता स्वस्त बसणार नाही, असा इशारा सरकारला दिला आहे. 


पाहा व्हिडीओ : Manoj Jarange : Devendra Fadnavis यांनी मतदानासाठी मराठा समाजाला गृहीत धरू नये - मनोज जरांगे