बीड : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल जगताप (Anil Jagtap) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असून, आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी सकाळीच बीडमधून 500 गाड्यांचा ताफा घेऊन शक्तीप्रदर्शन करत अनिल जगताप हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. 


दोन दिवसांपूर्वी अनिल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडण्याचे कारण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. यावेळी पक्षांमध्ये अन्याय होत असून, सुषमा अंधारे या आर्थिक व्यवहार करून अनेक नवीन लोकांचा पक्षात प्रवेश करून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर, जुन्या शिवसैनिकांना त्यामुळे त्रास सहन करावा लागतोय असं म्हणत अनिल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आज अखेर मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तर, पक्षाने संधी दिल्यास बीडमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं देखील अनिल जगताप म्हणाले आहेत. 


बीड जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार


मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला बीड जिल्ह्यात सतत खिंडार पडत असल्याचे दिसत आहे. सुषमा अंधारे यांच्या त्रासाला कंटाळून शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षात नवे तीन जिल्हाप्रमुख यांची निवड करण्यात आली होती. या निर्णयानंतर लगेचच 73 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तसेच, दोन दिवसांपूर्वी माजी जिल्हाप्रमुख तथा सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांनीही उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. अशीच काही भूमिका युवासेनाचे विभागीय सचिव विपुल पिंगळे यांनीही स्पष्ट केली. दरम्यान, उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या या सर्व नेत्यांचा आज मुंबईत शिंदे गटात प्रवेश होत आहे. सोबतच, परळी, केज, माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई तालुक्यांतील जवळपास 57 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 


शिवसैनिकांचे सामूहिक राजीनामे 


गेल्या महिन्यात देखील बीडच्या ठाकरे गटात एकाचवेळी अनेक शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. तर, बीड जिल्ह्यातील ठाकरे सेना आता अंधारे सेना झाली असल्याचा आरोप देखील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून करण्यात आले. त्यामुळे उपजिल्हाप्रमुख यांच्यासह तालुकाप्रमुखांनी आणि शेकडो शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे ठाकरे गटात राजीनामे सत्र अजूनही सुरूच आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


बीडच्या शिवसैनिकांचे सामूहिक राजीनामे; ठाकरे गटात खळबळ; सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप