बीड : जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत असून, ठाकरे गटात एकाचवेळी अनेक शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिले असल्याचे समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Uddhav Balasaheb Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून अनेक शिवसैनिकांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. बीड (Beed) जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील ठाकरे सेना आता अंधारे सेना झाली असल्याचा आरोप देखील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. तर, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह तालुकाप्रमुखांनी आणि शेकडो शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. 


बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आर्थिक देवाणघेवाण करत असल्याचा गंभीर आरोप देखील परळीचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी तीन नव्याने जिल्हाप्रमुखांची निवड केली. यानंतर आज अंधारे यांच्या परळीतील होमपीचवरून तालुकाप्रमुखांनी पत्रकार परिषद घेत आपले राजीनामे दिले आहेत. परळीचे व्यंकटेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख अभय कुमार ठक्कर, अंबाजोगाई तालुका प्रमुख राजाभाऊ लोमटे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. जिल्ह्यात ठाकरे सेना नाही तर अंधारे सेना करण्याचे काम सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तर, अंधारे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलो असल्याचे म्हणत पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींना पाठवले आहेत. दरम्यान, या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.


बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या...



  • अनिल जगताप : सहसंपर्कप्रमुख (बीड-माजलगाव विधानसभा) 

  • बदामराव पंडित : सहसंपर्कप्रमुख (बीड-गेवराई विधानसभा) 

  • बाळासाहेब आंबोरे : सहसंपर्कप्रमुख (केज-परळी विधानसभा) 

  • गणेश वरेकर :  जिल्हाप्रमुख (बीड-माजलगाव विधानसभा) 
    परमेश्वर सातपुते : जिल्हाप्रमुख (गेवराई-आष्टी विधानसभा)

  • रत्नाकर शिंदे :  (केज-परळी विधानसभा)

  • निजाम शेख : शहरप्रमुख (बीड नगर परिषद) 


आर्थिक देवाणघेवाणीतून नवीन नियुक्त्या 


बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली असून, नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यावरूनच अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फक्त सुषमा अंधारे यांच्या गटाच्या लोकांना संधी दिली जात असून, आर्थिक देवाणघेवाण करून पदे दिले जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. अंधारे यांच्याकडून पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आपण आपल्या पदाचे राजीनामे देत असल्याचं राजीनामे देणाऱ्या शिवसैनिकांकडून सांगण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sushma Andhare reaction On Advay Hire Case : अद्वय हिरेंनी शिवसेना सोडून भाजपसोबत येतो म्हणावं, लगेच कारवाई थांबेल; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!