Bogus Seeds-Fertilizer in Marathwada : नांदेड जिल्हा सोडला तर मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात अजूनही अपेक्षित पाऊस पडला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबादसह औरंगाबादच्या शेतकऱ्यांवर बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. तर बियाणे न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात येत असून, त्यानुसार पंचनामे देखील करण्यास सुरुवात झाली आहे. ज्यात औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील पुरवठा झालेल्या खतांचे नऊ नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. लातूर जिल्ह्यात बियाणे न उगवल्याच्या 220 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल झाल्या आहेत, बीडच्या अंबाजोगाईतील 60 तक्रारी दाखल झाल्या आहेत, तर उस्मानाबाद जिल्ह्यात देखील 36 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत.
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेल्या सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचे नऊ नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल नाशिक येथील प्रयोगशाळेकडून शनिवारी रात्री प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. या खतामुळे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांचे नुकसान झाले असून, कपाशीची पाने लाल होऊन सुकून गेली होती. तर यामुळे तालुक्यातील तब्बल 3 हजार हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्यावर या खताचे नुमने कृषी विभागाने प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचे नऊ नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी सोयगाव हे माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे.
लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणाचा फटका बसला असल्याचे अनेक प्रकरण आता समोर येत आहे. महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींचा कृषी विभागाकडे येत असून, सोमवारपर्यंत 220 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. तर आतापर्यंत जवळपास 143 जणांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच पंचनामे पूर्ण झाल्यावर याचा अकोला येथील विभागीय आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
बीड : तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील बोगस बियाणाचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. बीडच्या अंबाजोगाईमध्ये आधीच एक महिना उशिरा पेरणी झाली आहे. त्यातच आता पेरलेले बियाणे उगवून न आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. त्यात आता खूप उशीर झाल्याने दुबार पेरणी करणे देखील शक्य नाही. तर पेरलेले बियाणे उगवून न आल्याने आतापर्यंत 60 तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात आल्या आहेत. तसेच अजूनही तक्रारी सुरुच आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यात देखील काही वेगळी परिस्थिती नसून, या ठिकाणी देखील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहेत. कारण काही ठिकाणी सोयाबीन उगवत नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. जिल्ह्यात 24 जुलैपर्यंत 4 लाख 42 हजार हेक्टवर पेरणी झाली असून, यामध्ये सर्वाधिक 3 लाख 89 हजार 736 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकण्यात आल्याने सोयाबीन उगवत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 36 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
अतिवृष्टी! दोन दिवसांत नांदेडमधील 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली; 2 लाख हेक्टरवरील पिके आडवी