Dhananjay Munde in Farmers Farm : मागील वर्षीप्रमाणे यंदाही परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज स्वतः शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. 


कृषीमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर


परळी तालुक्यातील काही गावांमध्ये धनंजय मुंडे यांनी पाहणी केली असता गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वास्तव समोर आले. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे एकूण उत्पन्नावर जर परिणाम होणार असेल तर या पिकांचे महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे केले जावेत. उत्पादनाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करता यावे, यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधत उद्या सायंकाळपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.


नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश


राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यात दाखल होताच, परळी तालुक्यातील बेलंबा, वाघबेट या परिसरातील सोयाबीन, कपाशी आदी गोगलगायीनी प्रभावित झालेल्या क्षेत्राची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोगलगायींना नष्ट करण्याच्या विविध औषधी आणि उपाययोजनांबाबतही माहिती घेतली. 


जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून औषधे देण्याबाबत चाचपणी 


गोगलगायींना नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरणारे मेटाडेल हे औषध बाजारात सहजरित्या उपलब्ध असून त्याची किंमतही फार जास्त नाही. तेव्हा जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून कृषी विभागाला राखीव ठेवण्यात येणाऱ्या निधीमधून या औषधाची खरेदी कृषी विभागाला करता येईल का? याबाबत चाचपणी करून तातडीने निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निर्देश दिले असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. 


पिकं तुडवू नका रे!


दरम्यान, बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून बऱ्याच ठिकाणी उशिरा पेरण्या झालेल्या आहेत. सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके हे हातभरही उगवलेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासोबत पाहणी करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी आणि शेतकरी हे बांधावर आले असता धनंजय मुंडे यांनी "पिकं तुडवू नका रे... आधीच थोडं उगवलं आहे, आपल्या पायांनी आणखी त्यांचे नुकसान करू नका!" अशा सक्तीच्या सूचना सर्वांनाच दिल्या. तर कमी पावसाने सध्या पेरण्यांचे प्रमाण कमी आहे, तसेच पाऊस आणखी लांबल्यास दुबार पेरणीचे संकटही येऊ शकते, मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहील, असा विश्वास माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक येणार, धनंजय मुंडेंचा निर्णय