Parli Accident : राज्यासह सध्या चर्चेत आलेलं बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) रोज नवीन वळण घेत असतानाच बीडमधील आणखी एका सरपंचाचा बळी गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यातच आता परळी (Parli) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर (Abhimanyu Kshirsagar) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आहे की घातपात आहे? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. आता याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे. एकीकडे संतोष देशमुख प्रकरण गाजत असतानाच आणखी एका सरपंचाचा जीव घेल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत, याबाबत सुरेश धस यांनी बोलताना हा अपघात आहे की घातपात आहे असा सवाल उपस्थित केला आहे. 
 
आज शिर्डीत सुरेश धस यांनी याप्रकरणाबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा अपघात झाला की घातपात याबाबत चर्चा रंगल्या आहेत. काल रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली. बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात चालू आहे. रात्री झालेली घटना घातपात की अपघात याचा शोध अजून लागायचा आहे. परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टीप्पर बंद नाहीत. या अवैध व्यवसायांना परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी याला जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी शिर्डीत बोलताना दिली आहे. 


अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा 


अभिमन्यू क्षीरसागर यांची दुचाकी अक्षरशः चेंदामेंदा झाली आहे. दुचाकीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, हा अपघात इतका भीषण आहे की, त्या दुचाकीचा एक-एक भाग विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे.


नेमकं काय आहे प्रकरण? 


परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले. त्यात अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सरपंचाच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर हे रात्री त्यांच्या शेतातून घरी परतत होते. त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला. हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत आहेत.