बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी असलेला विष्णू चाटे यांचा फोन अद्याप सीआयडीला (CID) मिळाला नसल्याची माहिती आहे. विष्णू चाटेचा (Vishnu Chate) मोबाईल अजूनही 'सीआयडी'ला मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.  विष्णू चाटे (Vishnu Chate) फरार असताना नाशिकमध्ये मोबाईल फेकून दिला असल्याची माहिती आहे, तो कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नसल्याचे तो 'सीआयडी'ला सांगत असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत पाच मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे.


फोनवरून सरकारी वकिलांना न्यायाधीशांनी केला सवाल


आत्तापर्यंत जप्त केलेले सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. विष्णू चाटेच्या मोबाईल वरूनच खंडणीची धमकी देण्यात आली होती. हत्या प्रकरणात देखील विष्णू चाटेचा (Vishnu Chate) मोबाईल महत्त्वाचा आहे. याच मोबाईल संदर्भामध्ये काल केज जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद चालू असताना सरकारी वकिलांना न्यायाधीशांनी प्रश्न केले होते. जर 25 दिवसापासून हा आरोपी तुमच्या ताब्यात आहे, तर आणखी मोबाईल आढळून कसा आला नाही असा प्रश्न सरकारी वकीलांना विचारण्यात आला आहे. त्यामुळे खंडणीच्या गुन्ह्यात मोबाईल आणि व्हाईस सॅम्पल या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असताना केवळ व्हाईस सॅम्पल विष्णू चाटे याचे सीआयडीकडे आहे, मोबाईल मात्र अद्याप आढळून आलेला नाही, पोलिस त्याचा तपास करत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपीवर मोका लावण्यात आला आहे.दरम्यान, यातील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, दोन कोटींची खंडणी, मारहाण व अॅट्रॉसिटी या गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे. हत्या प्रकरणात सात आरोपी अटकेत असून, आंधळे 9 डिसेंबर 2024पासून मोकाटच आहे. सीआयडीला या तीनही गुन्ह्यांतील एकही आरोपी सापडला नव्हता. सर्व आरोपी हे बीड पोलिसांनीच पकडले आहेत.


संतोष देशमुखाच्या हत्या ठिकाणाहून कोयत्यासह वायर जप्त


सरपंचांची हत्या झालेल्या ठिकाणाहून कोयता, वायर, काठी जप्त केली आहेत. तसेच पाच मोबाइलही जप्त केले. यातील दोन मोबाइल जयराम चाटे आणि महेश केदार यांचे आहेत. तर उर्वरित तीन मोबाइल कोणाचे आहेत, या तपासासाठी ते फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत.


एसआयटी बरखास्त होण्याबाबच्या चर्चा


हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली होती. परंतु यातील उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे फोटो खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडसोबत दिसले. त्यानंतर काहींना त्यातून वगळण्यात आलं आहे, त्यामुळेच आता ही एसआयटी बरखास्त करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावरून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.