Seat Belt:  प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाल्यानंतर देशभरात सीट बेल्टची (Seat Belt) जोरदार चर्चा सुरू आहे. सुरक्षितेच्यादृष्टीने सीट बेल्टचा वापर आवश्यक असल्याच्या मुद्यावर तज्ज्ञांनी भर दिला आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारनेदेखील कारच्या मागील आसनावर बसणाऱ्या प्रवाशानेदेखील सीट बेल्ट लावणे अनिवार्य करणार असल्याचे संकेत दिले आहेत. कारमध्ये असणारा सीट बेल्ट हा सुरुवातीच्या काळात कारमधील चालक, प्रवाशांसाठी तयार करण्यात आला नव्हता. 


सीट बेल्टच्या संशोधनाचे श्रेय जॉर्ज कॅली (Engineer George Cayley) यांना जाते. त्यांनी इसवी सन 1800 च्या आसपास सीट बेल्टचा वापर केला होता. आपल्या ग्लायडरसाठी त्यांनी डिझाइन केला होता. त्यावेळी एविएशन सेक्टरमधील सर्वात महत्त्वाच्या संशोधनांपैकी एक संशोधन समजले जाते. या सीट बेल्टचा वापर पायलटसह प्रवाशाच्या आसनासाठीदेखील करण्यात आला. 


कारमध्ये वापरण्यात येणारा सीट बेल्ट तयार करण्याचे श्रेय अमेरिकन संशोधक एडवर्ड क्लॅगहॉर्न यांना जाते. त्यांनी 1885 मध्ये डिझाइन केलेल्या सीट बेल्टचा वापर न्यूयॉर्कमधील टॅक्सींमध्ये करण्यात येत होता. त्यानंतर 1946 मध्ये डॉक्टर C. Hunter Shelden यांनी ऑटोमोटिव्ह व्यवसायासाठी महत्त्वाचे काम केले.  retractable seat belt ची संकल्पना त्यांची होती. 


डॉक्टर शेल्डन हे कॅलिफोर्नियातील Huntington Memorial Hospital या रुग्णालयात न्यूरोसर्जन होते. कार अपघात गंभीर जखमी झालेले अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असे. त्यातील बहुतांशीजणांना डोक्याला मार लागलेला असायचा. त्यानंतर त्यांनी सीट बेल्ट तयार केला. डॉ. शेल्डन यांनी डिझाइन केल्यानंतर सीट बेल्टची लोकप्रियता वाढली आणि 1950 च्या सुमारास सगळ्याच रेसिंग कारमध्ये त्याचा वापर होऊ लागला. अनेक ठिकाणी रेसिंग कारमध्ये सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले. त्यावेळी कारमध्ये सीट बेल्ट फॅक्ट्रीफिटेड नव्हता. वेगळा खरेदी करावा लागत असे. 


अमेरिकन कंपनी NASH ने पहिल्यांदा 1949 मध्ये आपल्या कारमध्ये सीट बेल्टचा समावेश केला होता. त्या कंपनीने 40 हजार कारमध्ये सीट बेल्ट बसवले होते. त्यावेळी अनेक डीलर्सने सीट बेल्ट काढण्याची सूचना केली होती. अनेक कारचालक सीट बेल्ट वापरत ही नव्हते. फोर्ड कंपनीने 1955 मध्ये सीट बेल्ट कारमध्ये देण्यास सुरुवात केली. त्यावेळी सीट बेल्ट हा ऐच्छिक होता. फोर्डच्या माहितीनुसार, त्यावेळी 100 पैकी 2 कारचालकच सीट बेल्टचा वापर करत असे. स्वीडनमधील कार कंपनी SAAB ने पहिल्यांदा  आपल्या कारसाठी सीट बेल्ट हे स्टँडर्ड फिचर केले. 


सीट बेल्टची सुरुवात झाली तेव्हा टू पॉईंट सीट बेल्ट होते. यामुळे फक्त कंबरेला सुरक्षा मिळत होती. त्यानंतर सीट बेल्टच्या डिझाइनमध्ये बदल होत गेला आणि शरीराची सुरक्षा अधिक चांगली झाली. सध्याच्या कार्समध्ये असणारा सीट बेल्ट हा 3 पॉईंट सीट बेल्ट आहे.  


सीट बेल्टच्या डिझाइनमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. चार, पाच, सहा पॉईंटचे सीट बेल्ट आहेत. मात्र, हे सगळे सीट बेल्ट रेसिंग कारमध्ये असतात. 7 पॉईंटच्या सीट बेल्टचा वापर एअरक्राफ्टमध्ये पायलटच्या आसनावर होतो. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI