औरंगाबाद : टोमॅटो उत्पादक शेतकरी आज संकटात सापडला आहे. आधीच कोरोनाचं संकट त्यात हजारो रुपये खर्चून उभ्या केलेल्या टोमॅटो पिकाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आज औरंगाबाद येथील एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने टोमॅटोला 1 ते 2 रुपये भाव मिळाल्याने आत्महत्या केली आहे. 


टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. मात्र  भाव मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने शेतातच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील परसोडा गावात ही घटना घडली आहे. राजू बंकट सिंह महेर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.  


परसोडा धोंदलगाव शिवारात गट नंबर 548 मध्ये राजू महेर यांची शेती आहे. त्यांनी दोन एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. उत्पादन चांगले झाले. रविवारी त्यांनी टोमॅटो लासूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी नेले. मात्र टोमॅटोला केवळ 1 किंवा 2 रुपये भाव मिळाला. यामुळे निराश होऊन राजू महेर घरी परतले. आज सकाळी त्यांनी शेतात फवारणीतून उरलेले कीटकनाशक प्राशन केले. त्यांना  ताबडतोब उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले. परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


भाव नसल्याने शेतकऱ्यांना कष्टाने पिकवलेले टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ


सर्वसामन्यांना एक किलो टोमॅटो खरेदीसाठी 10 ते 20 रुपये खर्चावे लागत आहेत. मात्र तेच टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रति 20 किलो 50 ते 60 रुपयांना विकत घेत आहेत. यात शेतकऱ्यांना त्यांनी खर्च केलेले पैसे परत मिळत नाहीयेत. शेतात केलेली मेहनत वेगळीत, त्याचं मोलच नाही. 


भारतातून टोमॅटो निर्यात खुलीच, राज्यानं केंद्राला प्रस्ताव पाठवावा: डॉ भारती पवार


सत्ताधारी व विरोधकांच्या दारात टोमॅटो ओतणार, अजित नवले यांचा इशारा


गेल्या अनेक दिवसापासून टोमॅटो उत्पादक आर्थिक संकटात सापडला असून टोमॅटो उत्पादकांना दिलासा द्या, अशी मागणी किसान सभेचे अजित नवले यांनी केली होती. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही दारात टोमॅटो ओतून आंदोलन करू, असा इशारा काही दिवसांपूर्वी अजित नवले यांनी दिला होता. 


टोमॅटो शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत करा- सदाभाऊ खोत


टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे टोमॅटो शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत करा. किलो मागे 10 रुपये अनुदान द्या, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली होती.