नाशिक : टोमॅटोला भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली. मात्र मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने सध्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. जून महिन्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी यंदा टोमॅटोला भाव मिळेल या आशेवर त्याची लागवड केली. लागवडीसाठी एकरी एक लाखा पेक्षा जास्त खर्च येतो. धमोडे येथील एका शेतकऱ्याने एक एकरात टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी त्यांनी एक लाखांपेक्षा जास्त खर्च केला. मात्र परवा त्यांनी आपला माल विक्रीस आणला असता व्यापाऱ्याला 10 रुपये जाळी घ्या अशी विनंती करून सुद्धा ती न घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाने रस्त्यावर सगळी टोमॅटो फेकून दिले. 


सध्या टोमॅटो जेव्हा बाजार समितीत येतो तेव्हा 20 किलोच्या जाळीला अवघा 50 ते 60 रुपये भाव मिळतोय. कधी कधी 10 ते 15 रुपये इतका निचांकी भाव मिळत असल्याने विकण्यापेक्षा तो फेकून देण्याची मानसिकता शेतकऱ्याची झालीय. यावर्षी सर्वत्र बंपर पीक निघाल्याने टोमॅटोला मागणी कमी आणि आवक जास्त अशी परिस्थिती झाल्याने लागवड, मजुरी, वाहन खर्च निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर किंवा जनावरांना टाकत असल्याच्या घटना नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी घडल्यात. कर्ज काढून शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली मात्र तो खर्च आता वसूल होत नसल्याचे शेतकरी सांगतात. 


सर्वसामन्यांना एक किलो टोमॅटो खरेदीसाठी 10 ते 20 रुपये खर्चावे लागत आहेत. मात्र तेच टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रति 20 किलो 50 ते 60 रुपयांना विकत घेत आहे. यात शेतकऱ्यांना त्यांनी खर्च केलेले पैसे परत मिळत नाहीयेत. शेतात केलेली मेहनत वेगळीत, त्याचं मोलच नाही. 


सत्ताधारी व विरोधकांच्या दारात टोमॅटो ओतणार, अजित नवले यांचा इशारा


गेल्या अनेक दिवसापासून टोमॅटो उत्पादक आर्थिक संकटात सापडला असून टोमॅटो उत्पादकांना दिलासा द्या, अशी मागणी किसान सभेचे अजित नवले यांनी केली आहे. नको त्या विषयावरचे राजकारण थांबवा अन्यथा सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही दारात टोमॅटो ओतून आंदोलन करू, असा इशारा अजित नवले यांनी दिला. 


टोमॅटो शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत करा- सदाभाऊ खोत


टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे टोमॅटो शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत करा. किलो मागे 10 रुपये अनुदान द्या, अश मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सदाभाऊ खोत यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेला आज भेट दिली. त्यावेळी त्यांच्या समोरच शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या.