औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीमुळे राज्यातच जातीचं राजकारणात वाढ झाल्याचं केलेलं वक्तव्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या मताशी सहमत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच राज्यात जातीवाद वाढला आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
राज ठाकरे यांच्या भूमिकेला, बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पाहिलं तर कुणी जातीपातीचं राजकारण केलं ते सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे मला असं वाटत नाही. अशाप्रकारे जातीयवाद फोफावण्याचं काम राष्ट्रवादीनेच केलं आहे, असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
आरोपांना उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटलं होतं की, राज ठाकरे यांना माझा सल्ला आहे की, त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचे लिखाण वाचले पाहिजे. त्यातून त्यांचे गैरसमज दूर होतील, असा टोला शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लगावला.
शरद पवारांच्या टीकेला उत्तर देतांना राज ठाकरे यांनी म्हटलं की, मी प्रबोधनकार ठाकरे जसे वाचलेत तसे यशवंतराव चव्हाण देखील वाचलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जाती जातीमधे द्वेष निर्माण होत गेला. जातीपातीचे राजकारण आधीही होत होते. मात्र, राष्ट्रवादीकडून द्वेष निर्माण करण्यासाठी राजकारण करण्यात आले. महाराष्ट्रातील जनता कधीतरी विकासाच्या मुद्यावर मत देईल ही अपेक्षा. प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणातील हवे तेवढेच घ्यायचे असं केलं जातय. यशवंतराव चव्हाणांची विचार करण्याची प्रक्रिया कशी होती हे देखील मला ठावूक आहे. मी शरद पवारांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलाखत घेतली होती तेव्हा मुलाखती आधी म्हटलं होतं की काही गोष्टी आज राखून ठेवाव्या लागतील. कारण वाढदिवसाच्या दिवशी चांगलं बोलायच असतं.
सर्वात आधी काय म्हणाले होते राज ठाकरे?
गेल्या काही वर्षांत जातीच्या आधारे राजकारणात वाढ झाली आहे. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कुणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले. मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
संबंधीत बातम्या
- राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जाती-पातीचं राजकारण वाढलं; राज ठाकरे यांच्याकडून पुनरुच्चार
- राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शरद पवारांचं उत्तर...