औरंगाबाद : औरंगाबाद आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या सात मानाच्या पालखी सोहळा पैकी एक संत एकनाथ पालखी सोहळा. साडेचारशे वर्षापेक्षा अधिकची या पालखी सोहळ्याला परंपरा आहे. मात्र इतिहासात पहिल्यांदाच मोजक्या वारकऱ्यांसह पालखीने प्रस्थान केले आहे. दशमीपर्यंत ही पालखी समाधी मंदिरातच मुक्कामी असणार आहे.


डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, तोंडाला मास्क आणि 20 वारकऱ्यांच्या उपस्थितीत नाथाच्या पालखीने दुपारी 1 वाजेच्या दरम्यान नाथच्या जुन्यावाड्यातून प्रस्थान ठेवलं. एरवी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत,भानुदास एकनाथ गजरामध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय पालखी विश्वस्तांनी घेतला होता.


अगदी सकाळपासून गोदावरीच्या काठावर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळायची. मात्र आज गोदावरीचा काठ भक्ताविना ओस होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी पैठणमध्ये एकत्र येतात. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वर्षभर एकमेकांपासून दूर राहिलेले वारकरी, महिनाभर वारीच्या निमित्ताने एकत्र राहतात. पालखी हे त्यांच्यासाठी घर होऊन जातं. मात्र यावेळी या आनंदापासून दूर राहावे लागणार असल्याने प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह काही दिसला नाही.


या सोहळ्याला सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्यांनी 40 ते 50 वर्ष या वारीत सहभाग घेतला आहे, या वारीचे ते साक्षीदार आहेत. तुळशीराम काकडे हे गेल्या 50 वर्षांपासून न चुकता वारी सोहळ्यात सहभागी होतात. त्यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षात अनेक संकट आली. पाऊस, वादळ-वारा, पालखी वाटेतील घाट अशी अनेक संकट पाहिली, पण कधी हतबल झालो नाहीत. पण यावर्षी आमच्या हातात काहीच नाही. पण एवढंच भाग्य की चार पावलं तरी पालखी सोबत चाललो.


वारीत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकर्‍यांची ही अशीच काहीशी भावना होती. एरवी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस असायचे, पण यावर्षी वारीत वारकऱ्यांना सोशल डिस्टंसिंग सांगण्यासाठी पोलीस होते. वारीत अधिकचे वारकरी सहभागी होऊ नयेत म्हणून त्याचं लक्ष होतं. आता दशमीपर्यंत नाथांची पालखी नाथांच्या समाधी मंदिरात मुक्कामी असेल. रोज शासनाच्या नियमांनुसार भजन-कीर्तन होईल. दशमीला नाथांच्या पादुका वाहनानं पंढरपूरला पाच वारकरी घेऊन जातील.


प्रत्येक वर्षीच्या रीती-रिवाजाप्रमाणे काल्यापर्यंत पादुका पंढरपूरमध्ये असतील आणि हा सोहळा पार पडेल. नाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील हजारो वारकरी सहभागी होतात. कोरोनामुळे आज ते शरीराने जरी पैठणमध्ये नसतील तरी मनाने मात्र ते पैठणमध्येच असतील, यात शंका नाही. साडेचारशे वर्षाच्या सोहळ्याच्या इतिहासात हे वर्ष कायम वारकऱ्यांच्या स्मरणात राहील. आज वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी भानुदास एकनाथ या गजरासोबतच नाथांना एक मागणी करत असेल ती म्हणजे हे कोरोनाचं संकट दूर होऊ दे आणि पुढच्या वर्षी तरी वारीची परंपरा उत्साहात आणि आनंदात साजरी होऊ देत.