कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 11 Jun 2020 12:33 PM (IST)
औरंगाबाद शहरातील एका बंगल्यात बहिणभावाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी 9 जून रोजी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली होती.
या प्रकरणी मृतकांच्या चुलतभावासह त्याच्या मेव्हण्याला अटक केली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बहीण-भावाच्या हत्येच्या घटनेनं हादरुन गेलं होतं. या हत्यांचा छडा लावण्यात औरंगाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रँचला यश आले आहे. चुलत भावानेच आपल्या मेव्हण्याच्या मदतीने या दोन बहीण भावांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. मृतकांचा सतिश काळुराम खंदाडे (20) पाचनवडगांव, अर्जुन देवचंद राजपुत (24) रा.रोटेगांव रोड वैजापूरअशी आरोपींची नाव आहेत. दोघांची हत्या करुन घरातील दीड किलो सोने आणि रोख साडेसहा हजार पळवले पळवले होते. ही हत्या घरातील सोनं आणि शेतीच्या वादातूनच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात किरण खंदाडे (18) आणि सौरभ खंदाडे या बहीण भावाची हत्या झाल्याचे मंगळवारी समोर आले होते.
असा झाला घटनाक्रम
मयताची आई गावी जाताना नेहमी सोनं घालून जात असे. त्यामुळे आरोपींच्या नजरेत हे सोनं आलं. त्या दिवशी मयताची आई जालना जिल्ह्यातील पाचन वडगावला आली. आरोपी सतीश याच्या ते लक्षात आलं. त्याने मेहुणा अर्जुन याला फोन केला. त्यांनी टू व्हीलर मध्ये 500 रुपयांचं पेट्रोल टाकलं आणि जालना येथून 2 चाकू खरेदी केले. दोघेही लालचंद यांच्या औरंगाबादेतील घरात पोहोचले. चहा प्यायले, कॅरम खेळले. 4 वाजता किरणने या दोघांना फ्रेश होण्यासाठी सांगितले. साबण देण्याच्या बहाण्याने सतीश याने सौरभला बाथरूममध्ये बोलावलं आणि त्याचा गळा चिरला तर मेहुण्याने मागून चाकूचा वार केला. त्याच्या ओरड्यांचा आवाज आल्याने बहीण किरण बाथरूमकडे पळत आली. त्यावेळी आरोपींनी तिचाही गळा चिरला. आणि घरातील सोनं घेऊन पसार झाले.
मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बहिण-भावांचे मृतदेह बाथरूममध्ये आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयटीसमोरील अल्फाईन हॉस्पिटलच्या पाठीमागे दोन मजली बंगल्यात लालचंद खंदाडे भाड्याने राहतात. ते शेतीच्या कामानिमित्त जालना येथे गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी व एक मुलगी हेही गेले होते. त्यामुळे घरात त्यांची मोठी मुलगी किरण आणि तिचा भाऊ सौरभ हे दोघेच होते. रात्री आठच्या सुमारास लालचंद राजपूत घरी परतले. मात्र वाहनाचा हार्न वाजवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी वाहन उभे करून घरात पाहिले तर बाथरूममध्ये बहीण-भावाचे मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त डॉ. राहुल खाडे, मिना मकवाना, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळी चार चहाचे कप आढळले होते. यावरून हल्लेखोर हे ओळखीचे असावेत असा अंदाज वर्तवला गेला होता.