उस्मानाबाद : कोंबड्या पाळणाऱ्यांसमोर एक गहन प्रश्न उभा ठाकला आहे. कोंबड्या कशा पाळायच्या? खुराड्यात की मोकळ्या मैदानात? खुराड्यात कोंबडीपालन करणं क्रूर आहे. त्यावर बंदी घाला, अशी मागणी 'पेटा' या स्वयंसेवी संस्थेने दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. त्यानंतर न्यायालयाने अंतिम निकाल लागेपर्यंत कोंबड्यांना मोठ्या पिंजऱ्यात आणि आरामदायक अवस्थेत ठेवा, असे आदेश दिले आहेत.


अंडी उत्पादनात भारत तिसऱ्या, तर कोंबडी मांसाच्या उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर. त्यामुळे न्यायालयाचे पुढचे काय आदेश येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

टिचभर खुराडी आणि खचाखच भरलेल्या कोंबड्या ही आपल्याकडची कुक्कुटपालनाची पद्धत. दशकभरापूर्वी नेदरलंड, इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड या देशांनी कोंबड्यांना मोकळं सोडून 'फ्री रेंज पोल्ट्री' सुरु केली. कोंबड्या पाळायच्या त्या खुल्या मैदानातच. 'पेटा' या संस्थेनेही दिल्ली उच्च न्यायालयात तोच हेका धरला आहे.

पेटाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले. कोंबड्यांना खुराड्यात कोंबण्यास मनाई आहे. कोंबड्यांना मोठ्या पिंजऱ्यात, आरामदायी ठिकाणी ठेवण्यास सांगत कोर्टाने कोंबड्यांची वाहतूक करताना त्यांना लटकवून नेण्यास बंदी घातली आहे.

खुल्या कोंबड्या की खुराड्यातल्या कोंबड्या यावर सध्या दोन गट पडले आहेत....

खुराडे गटाचं समर्थन काय?

खुराड्यात कोंबड्यांच्या आरोग्याची काळजी शक्य
खुराड्यात कोंबड्यांची मरतूक कमी होते
खुराड्यात दर्जेदार आणि जिवाणूमुक्त अंडी उत्पादन होतं
खुराड्यात खाद्याची आणि औषधाची नासाडी होत नाही
खुराड्याच्या मर्यादित जागेत अधिक उत्पादन घेता येतं

मोकळ्या मैदानात कोंबडी पालन करणाऱ्यांचं मत काय?

खुराड्यातल्या कोंबड्यांमध्ये रोगराईची शक्यता जास्त असते
खुराड्यामध्ये कोंबड्या मरण्याचे प्रमाण जास्त असते
खुराड्यातल्या अंड्यांना जिवाणू-रोगजंतूंचा संसर्ग
खुराड्यात खाद्य आणि औषधांचा खर्च जास्त

महाराट्रातले 20 हजार पोल्ट्रीधारक महिन्याकाठी साडेतीन कोटी कोंबड्यांचं उत्पादन घेतात. दरमहा 30 कोटी अंड्यांचं उत्पादन होतं. अंडी आणि कोंबडीतून 51 लाख जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. मका आणि सोयाबीन पिकवणाऱ्या 45 लाख शेतकऱ्यांना पोल्ट्रीचा आधार आहे. साखर कारखानदारीपेक्षा अधिक लोक पोल्ट्री अवलंबून आहेत. सांगली, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांतल्या प्रामुख्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये पोल्ट्रीचा विस्तार झाला आहे.

भारतात पोल्ट्री उत्पादक पाच रुपयांना अंडे विकतात. खुल्या पद्धतीमुळे जागा अधिक लागेल. अंड्याची किंमत चौपट होईल. उत्पादकता आणि किंमत या मुद्द्यांवर परकीय पोल्ट्री उद्योग भारताशी स्पर्धा करु शकत नाही. त्यामुळे 130 कोटींच्या या देशातल्या बाजारपेठेत परकीय पोल्ट्री उद्योगांना शिरकाव करता आलेला नाही. म्हणूनच भारतीय पोल्ट्री उत्पादन महाग करण्यासाठी पाश्चात्त्य देशांनी एनजीओंना हाताशी धरुन येथील पोल्ट्री पद्धतींना आडकाठी करण्याचा डाव रचला आहे, असा गंभीर आरोप होत आहे.