बीड: मराठवाड्याला पाणी देऊ नये अशा प्रकारची याचिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय दिला. या मुद्द्यावरून जायकवाडीला पाणी सोडण्यासंदर्भात माध्यमांची भूमिकाही महाराष्ट्र एकसंध कसा राहील अशी असली पाहिजे, असा सल्ला देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण  विखे पाटील यांना काय सल्ला देणार याकडे लक्ष लागले आहे.


अंबेजोगाईमध्ये चव्हाण यांना राधाकृष्ण विखे पाटील यांना तुम्ही यासंदर्भात काही सल्ला देणार का? असे म्हटल्यावर चव्हाण म्हणाले की, मी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या विरोधात नाही. ज्या वेळेस प्रकल्प तयार झाला त्या वेळेस या प्रकल्पातील पाणी कोणत्या हद्दीत किती द्यायचं आणि मराठवाड्याला किती द्यायचं हे ठरलेलं आहे. पाण्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे पडू नयेत आणि मी स्वतः विखेपाटलांशी बोलणार आहे, असे ते म्हणाले.

मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून राजकारण तापत आहे. नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा असे आंदोलन होत आहे. यात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका ही नगरवासियांसोबत असल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे.

अहमदनगर आणि नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय दिला.