औरंगाबाद : मागच्या महिनाभरापासून कोरोना आणि म्युकरमायकोसिसच्या संसर्गाने ग्रासलेल्या डॉ. राहुल पवार यांची झुंज अखेर अयशस्वी ठरलीय. आज दुपारी उपचारादरम्यान 3 वाजुन 15 मिनिटांनी राहुलने अखेरचा श्वास घेतला. हलाखीच्या परिस्थितीत डॉक्टर होण्याचं स्वप्न राहुलने पाहिलं होतं. मात्र, हे स्वप्न आता अर्धवटचं राहिलं आहे.

  


परभणीच्या पाथरी येथील आनंद नगर तांड्यावरील ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉक्टर राहुल पवार याने तृतीय वर्षाच्या परीक्षेदरम्यान कोरोनाची लागण झाली होती. त्यातच त्याला म्युकरमायकोसिसचा संसर्गही झाला. त्यामुळे त्याच्यावर मागच्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने गावकरी, त्यांचे मित्र यांनी मदतीसाठी मोठी चळवळ उभारत निधी ही गोळा केला होता. मात्र, आज अखेर त्यांचे निधन झाले आहे.


परभणीच्या पाथरी तालुक्यातील आनंद नगर तांडा येथील डॉ. राहुल विश्वनाथ पवार हा तरुण आपल्या आई-वडिलांना ऊस तोडण्याच्या कामांमध्ये मदत करायचा. त्यांच्याच पाठिंब्यावर लातूर येथील एमआयटी कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करुन रुग्णांची सेवा करण्याचे त्याने स्वप्न बघितले. 'महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स' या युनिव्हर्सिटीची एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा गतवर्षी एप्रिल महिन्यात पार पडली. मार्चदरम्यान लेखी परीक्षा तर 16 ते 23 मार्च दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा झाली. कोरोनाची लक्षणे असतानाही या दोन्ही परीक्षा राहुलने पुर्ण तयारीनिशी दिल्या. परीक्षा नाही दिल्यास सहा महिने बॅक राहतात. त्यात परिस्थिती हालाखीची असल्याने हे परवडणारे नव्हते. म्हणून राहुलनेही परीक्षेलाच प्राधान्य दिले. परीक्षा झाल्यानंतर राहुलला कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला. शिवाय म्युकरमायोसीसचीही लागण झाल्यामुळे त्याला 1 मेपासून औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. अखेर आज त्याची प्राणज्योत मालवली.


आई-वडील ऊसतोड मजूर असल्याने कर्ज काढून त्यांनी अडीच लाख रुपये खर्च करून त्याच्यावर उपचार केले. मात्र, परिस्थिती आणखी बिघडल्याने त्यांना पुढचा खर्च उचलता येईना. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी विनंती केली होती. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही सोशल माध्यमातुन मदतीसाठी प्रयत्न सुरु केले. यानंतर अनेकांनी पुढे येत राहुलला मदतीचा हात दिला. सर्वांनाच राहुल परत येईल असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. या घटनेनंतर राहुलच्या कुटुंबावर दुःखाच डोंगर कोसळला आहे.