औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट येणार आणि लहान मुलांना याचा फटका बसणार असे सांगितलं जात आहे. त्यानुसार करावयाच्या उपाययोजनांबाबत पाऊले देखील उचलली जात आहेत. औरंगाबादमधील कमलनयन बजाज रुग्णालयात कोरोनाबाधित त्यातच मल्टी ऑर्गन फेल्युअर झालेल्या एका दोन वर्षांच्या चिमुकल्याला जीवनदान मिळालं. बाळ कोरोनाबाधित असल्यामुळे कोरोना निगेटिव्ह असलेली आई उपचार होईपर्यंत पीपीई किट घालून कोरोना वॉर्डमध्ये थांबली. डॉक्टरांच्या अथक मेहनतीला आईची साथ मिळाली आणि दोन वर्षांचा चिमुकला बरा झाला. दहा दिवसांनी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले
कमलनयन बजाज रुग्णालय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज होत असतानाच नांदेडचे दोन वर्षाचं बाळ रुग्णालयात भरती झालं. हे बाळ कोरोनामुक्त झालं होतं. मात्र कोविडनंतर खूप ताप येणं, कमी रक्तदाब, मेंदूज्वर, आतड्यांवर सूज, लघवीला कमी होणं असे सगळे त्रास त्या बाळाला होत होते. नांदेडच्या डॉक्टरांनी या बाळावर उपचार करायचा प्रयत्न केला मात्र अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांनी बाळाला औरंगाबादला नेण्याचा सल्ला दिला. मात्र हा केवळ एक प्रयत्न असेल बाळ वाचण्याची शक्यता कमीच आहे, असं त्यांनी बाळाच्या आई-वडिलांना सांगितलं. अशाप्रकारे बहुतांश अवयव निकामी झालेल्या (Multi Organ Failure) अवस्थेत हे दोन वर्षांचे बाळ 5 मे रोजी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल झालं.
मोठी आशा ठेवून आई-बाबा या बाळाला घेऊन आले होते. रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल पाठक यांनी बाळाला अॅडमिट करुन घेतलं खरं पण त्याच्यावर उपचार कसे करायचे आणि कुठून सुरुवात करावी हा प्रश्न होता. कारण बाळाला सगळ्याच उपचारांची तातडीने गरज होती. रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल गोसावी, डॉ. पवन मुंदडा, डॉ. श्रीपाद ढाकणे यांच्याशी चर्चा करुन डॉ. निखिल पाठक यांनी बाळावर Multiple Therapy चा उपयोग करुन उपचार करायचे ठरवलं.
बाळ कोरोनामुक्त आहे असं सांगितलं होतं तरीही उपचारांना सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा टेस्ट करणं गरजेचं आहे, असं वाटल्यामुळे बाळाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि दुर्दैवाने ती पॉझिटिव्ह आली. म्हणजे बाळ कोरोनामुक्त झालंच नव्हतं.
कोविड झालेल्या बाळामध्ये Multi Organ Failure असणं म्हणजे अत्यंत दुर्मिळ गोष्ट. आणि ती नेमकी या बाळाच्या बाबतीत घडली होती. आता बाळाच्या उपचारांमध्ये कोरोनाच्या उपचारांची भर तर पडलीच होती मात्र त्या पेक्षाही मोठा प्रश्न होता की बाळावर आता नॉर्मल वॉर्डमध्ये उपचार करता येणार नव्हते, त्याला कोविड वॉर्डमध्ये ठेवावं लागणार होतं आणि बाळ एकटं राहणं शक्य नव्हतं. बाळाच्या आई आणि बाबांचीही तपासणी करण्यात आली. दोघेही निगेटिव्ह आले. आता बाळाजवळ थांबण्याचा प्रश्न होता. मात्र आईने पीपीई किट घालून बाळासोबत कोविड वॉर्डमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाने सुद्धा परवानगी दिली आणि बाळावर उपचार सुरु झाले. बाळावर Multiple Therapy चे उपचार करण्यात आले. त्याला बीपी वाढवण्याची औषधं दिली गेली. डॉक्टरांचे पथक सतत बाळावर लक्ष ठेवून होतं. डॉक्टरांचे ज्ञान, उपलब्ध आधुनिक सुविधा आणि अथक परिश्रमामुळे अगदी मलूल होऊन आलेलं बाळ दोन दिवसांनी डोळे उघडून बघू लागलं आणि डॉक्टरांना आशा निर्माण झाली. अवघ्या आठ दिवसात बाळ नॉर्मलवर आले.
डॉक्टरांचे विविध उपचार आणि पीपीई किट घालून बाळाच्या आईने दिलेली साथ बाळाला मरणाच्या दाढेतून बाहेर घेऊन आली. या आठ दिवसात बाळ वॉर्डमधील सगळ्यांचं प्रिय झालं होतं. सगळे जण बाळाची काळजी घेत होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आले. आई-बाबा तर सुखावलेच पण डॉक्टरांच्या संपूर्ण टीमला आनंद झाला. दहा दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर बाळाला घरी सोडण्यात आलं.
बाळावर उपचार डॉ. निखिल पाठक यांच्यासोबत रुग्णालयातील अन्य नवजात शिशू रोगतज्ज्ञ डॉ. राहुल गोसावी, डॉ. पवन मुंदडा, डॉ. श्रीपाद ढाकणे तसंच भूलतज्ज्ञ डॉ. बनसोडे, डॉ. सचिन नाचणे आणि वॉर्डमधील संपूर्ण स्टाफने परिश्रम घेतले.
या यशस्वी उपचारांबद्दल कमलनयन बजाज रुग्णालयाचे चेअरमन सी पी त्रिपाठी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नताशा वर्मा, मेडिकल डायरेक्टर डॉ. मिलिंद वैष्णव यांनी डॉक्टरांचे तसंच बाळाच्या आई-वडिलांचं अभिनंदन केलं.
डॉ. निखिल पाठक
"अशाप्रकारची ही दुर्मिळ केस हाताळताना बाळाचा जीव आम्ही वाचवू शकलो याचा आनंद आहे. यात बाळाच्या आईनेही न घाबरता खूप सहकार्य केलं. येणारी लाट बालकांना जास्त बाधित करणारी असेल असा अंदाज आहे. मात्र पालकांनी घाबरुन न जाता वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार केल्यास फायदाच होतो," अशी प्रतिक्रिया डॉ. निखिल पाठक यांनी दिली.