औरंगाबाद : भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बॅंक खाते पीएफ कार्यालयाने सील केलं आहे. कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या थकबाकीपोटी 92 लाख रुपये कर्मचाऱ्यांचा पीएफ खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. सदर कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयाने केली. याशिवाय अन्य 172 कंपन्यांना 12 कोटींचा कर्मचाऱ्यांचा पीएफ थकल्यामुळे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली. भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांविरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
औरंगाबादच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने वैद्यनाथ कारखान्याचं बँक खातं सील केलं आहे. एवढंच नाही, तर त्यातून 92 लाख रुपये जप्त देखील करण्यात आलेले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने पीएफची रक्कम थकवली होती, त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही रक्कम न भरण्यात आल्याने कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे व त्यातून रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. अशी माहिती औरंगाबाद पीएफ ऑफिसचे क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी एबीपी माझाला दिली आहे.
कारखान्याने मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी थकीत रक्कम 1 कोटी 46 लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी एस आर वानखेडे यांनी वसुली नोंदवली.
एखाद्या कारखान्यांनी किंवा कंपनीने पीएफ भरला नाही तर काय कारवाई होते आणि काय नियम आहेत यावर एक नजर टाकूया...
- एखादी कंपनी किंवा कारखाना कर्मचाऱ्यांचा पीएफ भरत नसेल तर त्याला सुरुवातीला नोटीस दिली जाते.
- नोटीसच्या कालमर्यादेत जर पीएफ भरला गेला नाही तर त्या कारखान्याचे किंवा कंपनीचे अकाउंट सील केले जाते.
- त्यातून पीएफची रक्कम वर्ग करण्यात येते.
- जर खात्यात पैसे नसतील तर, मालमत्तेची ही जप्ती पीएफ कार्यालय करू शकते.
- त्यानंतर संबंधित मालकाला सहा महिन्याची शिक्षा ही होऊ शकते.
केवळ वैद्यनाथ कारखानाच नाही तर अशा 172 कंपन्यांना औरंगाबाद येथील पीएफ क्षेत्रीय कार्यालयाने नोटीस दिल्या आहेत. ज्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफची तब्बल 12 कोटी रुपयांची रक्कम पीएफ कार्यलयाकडे भरली नाही अशा कंपन्यांनाही नोटिसा बजावल्या असल्याची माहिती क्षेत्रीय अधिकारी तांबे यांनी दिली आहे.