उस्मानाबाद: राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील (Kailas Patil) हे शिंदे गटासोबत होते, पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फोनमुळेच कैलास पाटील हे गुजरात बॉर्डरवरून परत आले असा गौप्यस्फोट मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी केला आहे. विक्रम काळे यांच्या या वक्तव्यामुळे मात्र कैलास पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागील वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी बंडखोर आमदारांना थेट सुरतला हलवण्यात आलं होतं. यावेळी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हेही त्या आमदारांसोबत होते. पण त्यांची गाडी महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ पोहचली होती, पण नंतर ते परत आले. दिशाभूल झाल्याचं लक्षात आल्यावर आपण निसटलो असा दावा आमदार कैलास पाटील यांनी त्यावेळी केला होता.
नंतरच्या काळात आपण हे वक्तव्य विनोदाने केलं असल्याचा खुलासा विक्रम काळे यांनी केला. पण विक्रम काळे यांच्या या वक्तव्यामुळे कैलास पाटील हे चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी शिक्षक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केलं. या कार्यक्रमाला उस्मानाबादचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत
राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील (Kiran Patil) यांच्यात खरी लढत होणार आहे. औरंगाबाद (मराठवाडा) विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी 30 जानेवारीला सकाळी 08 ते सायंकाळी 04 या कालावधीत मतदान होणार आहे. औरंगाबाद विभागात मूळ मतदान केंद्र-222 व सहाय्यकारी मतदान केंद्र 05 या प्रमाणे एकूण 227 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्राची यादी निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना पूरविण्यात आली आहे. सोबतच निवडणूक प्रचारासाठी छपाई करण्यात येणारे पोस्टर्स, बॅनर्स, पोम्पलेटस इत्यादी प्रचार साहित्याच्या छपाईवर असलेले निर्बंध व Covid-19 साथरोगाचा प्रसार व प्रादूर्भाव टाळण्याचे अनुषंगाने निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, मार्गदर्शक सूचनांचा संच सर्व उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेला असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
ही बातमी वाचा: