Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. महिन्यात किमान दोन-तीन वेळा तरीही शहरातील वेगवेगळ्या भागातील पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत असल्याने नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच फारोळा येथे सातशे मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली असतानाच, आता फारोळा येथील पंपगृहाच्या 33 केव्ही सबस्टेशनमध्ये अचानक स्पार्किंग होऊन सीटी कंडक्टर तुटल्याने सहा तास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. 


गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यास प्रशासनासह सरकारला देखील आत्तापर्यंत यश आलेले नाही. त्यातच औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या 1200 आणि 700 मिमीच्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने सतत फुटत आहे. सोबतच जलशुद्धीकरण केंद्रावरील यंत्रणा देखील जुनी झाल्याने तिथे देखील सतत काहीना काही तांत्रिकदृष्ट्या बिघाड होतच असतो. त्यामुळे या सर्वांचा परिणाम औरंगाबाद शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. 


दोन दिवसांपूर्वीच फारोळा येथे 700 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली होती. पण जलवाहिनी दुरुस्त होऊन 24 तासही उलटत नाहीत, तो वादळी वाऱ्यासह पावसामुळे फारोळा येथील पंपगृहाला वीजपुरवठा करणाऱ्या 33 केव्ही सबस्टेशनमध्ये स्पार्किंग होऊन सीटी कंडक्टर तुटल्याने वीजपुरवठा खंडित होऊन शहराचा पाणीपुरवठा बंद पडला. यामुळे तब्बल सहा तास शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे आज शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तर अनेक भागात उशिरा पाणीपुरवठा केला जाणार आहे. 


मनपाची माहिती! 


याबाबत औरंगाबाद महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, औरंगाबाद पाणी पुरवठा 100 दलली योजनेवरील नवीन फारोळा पंपगृहाच्या (33 के.व्ही.) सबस्टेशनमध्ये 25 जानेवारी रोजी सकाळी 04:40 वाजता अचानक झालेल्या वादळी वारा व पावसामुळे स्पार्किंग (Sparking) होऊन सीटी कंडक्टर (CT Conductor) तुटल्यामुळे पंपिग बंद झाली. तसेच 56 दलली योजनेवरील जुने जायकवाडी पंपगृहातील पंप क्र. 1 च्या स्टार्टरमध्ये सकाळी 06:10 वाजता स्पार्कींग झाल्यामुळे पंपींग बंद झाली. यानंतर युद्धपातळीवर काम हाती घेऊन नवीन फारोळा पंपगृह येथे सबस्टेशनची तपासणी,दुरुस्ती करुन कंडक्टर बदली करण्यात आले. तर आवश्यक ती दुरूस्ती करुन सबस्टेशन चार्ज करण्यात आले. तसेच जुने जायकवाडी येथे देखील पंप क्र. 1 चे स्टार्टर दुरूस्ती काम करण्यात आले.


त्यामुळे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे 100 दलली योजनेची पंपींग एकुण 05: 50  मिनिटे व 56 दलली योजनेची पंपींग एकुण 02:50 मिनिटे बंद असल्यामुळे सदरील काळात पाणी उचल पूर्णपणे बंद होती. या कारणामुळे संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. शहरवासीयांना विनंती की तांत्रिकदृष्ट्या पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.  नागरिकांना होणाऱ्या गैरसोईबाबत दिलगीरी व्यक्त करण्यात आली. तसेच महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


संबंधित बातमी: 


Aurangabad Water Issue: जलवाहिनी फुटल्याने औरंगाबादकरांना आठ ते दहा तास उशिराने पाणीपुरवठा होणार