औरंगाबाद : मराठावाड्यातील वर्षानुवर्ष सुरु असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मराठवाड्यातील प्रमुख धरणे एकमेकांना जोडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबादच्या लासूर स्टेशन गावच्या चारा छावणीला भेट दिली, त्यावेळी नागरिकांशी साधलेल्या संवादादरम्याने त्यांनी हे आश्वासन दिलं.


दुष्काळ दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही. तसेच मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ असेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला दिला. त्यासाठी उपाययोजनाही सुरु केल्या असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.



मराठवाड्यातून दुष्काळ हद्दपार करण्यासाठी येथील प्रमुख 11 धरणे पाईपलाईनने एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. पाईपच्या माध्यमातून पिण्याचं पाणी मराठवाड्यात सर्वत्र पोहोचवलं जाणार आहे. पिण्याचे पाणी प्रत्येक ठिकाणी पोहचवण्याची वॉटर ग्रीड योजना आखण्यात आली आहे. इस्राईलसोबत करार करून हे काम पूर्ण केलं जाणार आहे. पुढील दोन महिन्यात यासाठी टेंडर काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


ही 11 धरणे पाईपलाईनने जोडणार

  • जायकवाडी (औरंगाबाद)

  • येलदरी (परभणी)

  • सिद्धेश्वर (हिंगोली)

  • माजलगाव (बीड)

  • मांजरा (बीड)

  • ऊर्ध्व पैनगंगा (यवतमाळ)

  • निम्न तेरणा (उस्मानाबाद)

  • निम्न मण्यार (नांदेड)

  • विष्णूपुरी (नांदेड)

  • निम्न दुधना (परभणी)

  • सिना कोळेगाव (उस्मानाबाद)


उर्ध्व पैनगंगा धरण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील असलं तरी लाभक्षेत्र मराठवाडा असल्याने हे मराठवाड्याच्या 11 मोठ्या धरणांमध्ये येतं.

गोदावरीच्या खोऱ्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात आणले जाणार आहे. या संबधीचा प्लान तयार आहे.



"सरकारचा मेसेज आल्याशिवाय पेरणी करु नका"


शेतकऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पेरणी संदर्भातही आवाहन केलं. सरकार पाऊस आणि पेरणी संदर्भातील मेसेज शेतकऱ्यांना मोबाईलवर पाठवत आहे. यंदा पाऊस थोडा उशिरा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या मेसेजनंतरच पेरणी करावी. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.