Municipal Corporation Election: महानगरपालिका निवडणूक तोंडावर असून लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहे. तर औरंगाबाद महानगरपालिका भाजपच्या 'विजयाच्या टार्गेटवर' असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून औरंगाबाद महानगरपालिकेवरून शिवसेनेवर हल्लाबोल केला जात आहे. शहरातील विकासाच्या मुद्द्यावरून भाजप सतत प्रश्न उपस्थित करत शिवसेनेवर निशाणा साधत आहे. मुंबई प्रमाणेच औरंगाबाद महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.


आधी फडणवीस आता दरेकर...


औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला असून, यावरून भाजपकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी फडणवीसांनी आपल्या भाषणातून पाण्याच्या मुद्द्यावरून सेनेवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे गेले तीस वर्ष महानगरपालिकेवर सत्ता असलेली शिवसेना भाजपच्या दोन्ही विरोधीपक्ष नेत्यांच्या 'टार्गेट'वर असल्याचं दिसतयं.


'मनसे'ची एंट्री...


आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत. मात्र याचवेळी मनसेची सुद्धा एन्ट्री झाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून भाजप बरोबर मनसे कडूनही सतत शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. एवढच नाही तर महापालिकेतील शिवसेनेच्या सत्ताकाळात केलेल्या कामकाजावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आज जरी भाजप-मनसे एकत्र नसली, तरीही भविष्यात जर युती झालीच तर शिवसेनेला भाजपसोबतच मनसेचाही सामना करावा लागणार आहे.


सभांचा धडाका...


आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच महत्त्वाच्या पक्षांकडून शहरात सभा घेण्याचा धडाका सुरू आहे. आधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा झाली. मग एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. त्यानंतर फडणवीसांनी मोर्चा काढत सभा गाजवली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. त्यामुळे आगामी काळात सुद्धा आशा सभांचा धडाका सुरूच रहाणार असल्याचं चित्र आहे.


शिवसेनाप्रमाणे भाजपही जवाबदार ?


औरंगाबाद महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला असून तो आपण बाहेर काढणार असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. मात्र गेली 20 वर्षे शिवसेनेसोबत भाजप सुद्धा महानगरपालिकेत सत्तेत होती. त्यात काही भाजप नेत्यांचे कचरा कंत्राटमध्ये तर काहींचा पाणी टँकरच्या लॉंबीत सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता तेही घोटाळे बाहेर काढणार असा प्रश्न दरेकर यांना विचारताच, भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असून सर्वच भ्रष्टाचार बाहेर काढली जातील असे ते म्हणाले. त्यामुळे दरेकरांची चौकशीची मागणी शिवसेना पुरतीच मर्यादित राहणार की, भाजप नेत्यांवर केलेल्या आरोपाची सुद्धा चौकशी करण्याची मागणी दरेकर करणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार.