Pravin Darekar On Chandrakant Khaire: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपाला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहेत. बेताल आरोप केल्याने प्रसारमाध्यमात 'पब्लिसिटी' मिळते असा खैरेंचा समज आहे. त्यामुळेच ते असे बेताल वक्तव्य करतात असा खोचक टोला दरेकर यांनी खैरेंना लगावला आहे. दरेकर हे औरंगाबाद दौऱ्यावर असून, माध्यमांना बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, असे बिनबुडाचे आरोप संजय राऊत यांच्यानंतर खैरे करायला लागले आहेत. अशाप्रकारे बेताल आरोप केल्याने प्रसारमाध्यमात 'पब्लिसिटी' मिळते असा खैरेंचा समज आहे. मला वाटते हजार कोटी दिले असतील तर पटवून द्यावे. तसेच त्यांच्या पक्षप्रमुखांनी सांगावे हजार कोटी कुणी कुठे आणि कसे दिले. शेवटी आता त्यांच्या पक्षाच्या विश्वासर्हतेचा प्रश्न आहे, असंही दरेकर म्हणाले.
काय म्हणाले खैरे...
जालना दौऱ्यावर असलेल्या खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ईडीच्या चालबाजी कशा असतात मला सर्व काही माहित आहे. मी त्या कमिटीवर होतो. फक्त घाबरव्याचं, बोलवायचं आणि फक्त शिवसेनेच्या लोकांना दाबायच. तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला.
यापूर्वीही झाला आरोप...
कळमनुरी मतदारसंघाचे आमदार यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यांनतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ठीक-ठिकाणी निदर्शने केली होती. तर आमदार संतोष बांगर यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा वंचितकडून देण्यात आला होता. त्यांनतर बांगर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता खैरे यांनी सुद्धा पुन्हा तोच आरोप प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वंचित आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.