Gram Panchayat Election: राज्यात ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू असून, आता प्रचाराला थोडे दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या (Political Party) मोठ्या नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तर आपली प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी देखील नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र काही ठिकाणी यंदा ग्रामपंचायत निवडणुका भल्या भल्या नेत्यांना डोकेदुखी ठरणार असल्याचं दिसतय. कारण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जन्मगावात तब्बल 30 वर्षांनी निवडणूक होणार आहे. 


रावसाहेब दानवे यांच जन्मगाव असलेल्या जवखेडा खुर्द गावात 30 वर्षा नंतर ग्रामपंचायतीचा धुराळा उडतोय. गेली 30 वर्ष बिनविरोध होणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये आज मात्र सरपंच पदासाठी आणि दोन सदस्यांसाठी निवडणूक लागलीय. एकूण 7 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये 4 सदस्य बिनविरोध निवडण्यात आले आहे. मात्र सरपंच पदासाठी आणि दोन सदस्यासाठी निवडणुक होणार आहे. विशेष म्हणजे गावातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची मध्यस्थी देखील कामाला आली नाही असच चित्र गावात पाहायला मिळतेय.


असा रंगणार सामना...


जवखेडा खुर्द गावात तब्बल 30 वर्षांनी निवडणूक होत असून, रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ मधुकर दानवे यांच्या पत्नी सुमन दानवे या भाजपकडून सरपंच पदासाठी आपलं भवितव्य आजमावणार आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार सुनिता संतोष दानवे रिंगणात असणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाचा विजय होणार हे निकालानंतरचं स्पष्ट होणार आहे. 


जिल्ह्यातील परिस्थिती...


जालना जिल्ह्यात 266 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात अंबडमधील 40, जालना 29 , परतूर 41, मंठा 35. घनसावंगी 34, जाफराबाद 55 व भोकरदनमधील 32 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर या ग्रामपंचायतीसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 


थेट जनतेतून सरपंच


फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेला थेट जनतेतून सरपंच हा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकराने रद्द केला होता. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर पुन्हा एकदा थेट जनतेतून सरपंच पदाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. मात्र यासाठी उमेदवाराला संपूर्ण मतदारांची मनधरणी करताना उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे.