Jalna Crime News:  जालना (Jalna) शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, मूलबाळ होत नसल्याने पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या (Murder) केली आहे. शहरातील शंकरनगर येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा सर्व प्रकार उघडकीस आली आहे. इंदूबाई किशोर आटोळे (वय 42 वर्षे, रा. शेळगाव आटोळ, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे मयत महिलेचे नाव असून, किशोर हिम्मतराव आटोळे (वय 42 वर्षे) असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील शेळगाव आटोळ येथील रहिवासी किशोर आटोळे व इंदूबाई आटोळे हे दांपत्य सात महिन्यापूर्वी जालना शहरातील शंकरनगर राहण्यासाठी आले. याच परिसरात ते किरायाने रूम करून राहत होते. किशोर आटोळे हा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत मजूर म्हणून कामाला होता. तर लग्न होऊन अनेक वर्षे झाले असतांनाही मूलबाळ होत नसल्याने त्यांच्यामध्ये रोज वाद व्हायचे. याच कारणावरून गुरुवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले.


इंदूबाईचा जागीच मृत्यू


किशोर आणि इंदूबाई यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरु झाले. दरम्यान पती किशोर आटोळे याने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. थेट डोक्यात वार केल्याने आणि मोठा रक्तस्त्राव झाल्याने यात इंदूबाई आटोळे यांचा जागीच मृत्यू झाला.


हत्या करून पती फरार...


पत्नीच्या मृत्यूनंतर किशोर आटोळे हा दरवाजा बंद करून फरार झाला होता. शुक्रवारी सकाळी नातेवाईक घरी आले असता, हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी याची माहिती तत्काळ कदीम पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. तर खून करून दरवाजा लावून संशयित किशोर आटोळे हा फरार झाला होता. त्याचा पोलिस दिवसभरापासून शोध घेत होते. रात्री सात वाजेच्या सुमारास जालना शहरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 


नोकरच निघाला चोर! जालन्यातील प्रसिद्ध होलसेल कापड दुकानातील चोरीचा पोलिसांकडून पर्दाफाश


मारहाणीत मजुराचा मृत्यू 


दुसऱ्या एका घटनेत पती-पत्नीचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चांधई येथे समोर आली आहे. कृष्णा अंबादास हिवाळे (वय 42 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कृष्णाच्या शेजारी राहणाऱ्या भिक्कन ठोंबरे व त्यांच्या पत्नीमध्ये वाद भांडण सुरु होते. त्यामुळे भांडणात मध्यस्थी करण्यासाठी कृष्णा गेला होता. मात्र तू आमच्या कौटुंबिक वादात का हस्तक्षेप करतो म्हणून भिक्कन ठोंबरे यांच्यासह पाच जणांनी कृष्णाला बेदम मारहाण केली होती. ज्यात त्याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी दिली आहे.