Jalna Crime News: जालना शहरात झालेल्या एका धाडसी चोरीच्या (Theft) घटनेचा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत पर्दाफाश केला आहे. शहरातील प्रसिद्ध होलसेल कापड दुकान (Cloth Shop) नथुमल वासुदेव दालनात सोमवारी धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तर या घटनेत तब्बल 1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला गेली होती. मात्र जालना पोलिसांनी (Jalna police) तपासाचे चक्र फिरवत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर या चोरीमागील मुख्य आरोपी त्याच कापड दुकानात कामाला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. कुणाल मनोज माडीवाले (रा. बरवार गल्ली काद्राबाद जालना)  असे या आरोपीचे नाव आहे. 


जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात महेश नथ्थुमल नाथानी (वय 54 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जुना मोंढा येथे त्यांचे नथुमल वासुदेव नावाचे होलसेल कापड दुकान आहे. दरम्यान रविवारी 25 डिसेंबर रोजी साडेनऊ वाजेच्या वेळेस कुणीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांच्या दुकानात प्रवेश करून, दुकानातील लॉकरचे दरवाजे तोडुन कापड विक्रीतून जमा झालेले 01 कोटी 70 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेले होते. सोबतच दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा DVR चोरुन नेला होता. त्यामुळे याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे चार तपास पथक तयार करून आरोपींना शोधण्याबाबत सूचना केल्या होत्या. 


पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी गुन्हयासंबधाने सखोल माहिती घेत तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांकडून गोपनीय माहिती मिळवत तपास सुरु केला. तपास सुरु असतानाच हा गुन्हा दुकानातील नोकर कुणाल मनोज माडीवाले यांने आपल्या इतर साथीदारासह केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधाराने पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. 


सापळा लावून घेतलं ताब्यात...


कुणाल माडीवाले याचा शोध सुरु असतांना तो शिर्डी येथे गेला असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक शिर्डी येथे पोहचले. तसेच कुणालचा तांत्रिकदृष्ट्या शोध घेतला असता तो, शिर्डी रेल्वेस्टेशन मधुन काकीनाडा सिकंदराबाद या रेल्वेत बसुन प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर कुणाल मनोज महाडीवाले याच्यासह दुर्गेश रमेश ढोलके (वय 21 वर्ष, रा. बरवार गल्ली काद्राबाद जालना)  यांना शिताफीने ताब्यात घेतले. तसेच दोन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. तर यावेळी रोहन पुनमचंद नाईक (वय 21 वर्ष रा. बरवार गल्ली काद्राबाद जालना)  आणि राजु लालचंद नाईक (वय 38 वर्ष रा. बरवार गल्ली, काद्राबाद जालना) हे दोघांचा देखील या चोरीत सहभाग असल्याची त्यांनी माहिती दिली. 


रात्री दुकानातच झोपला...


यातील मुख्य आरोपी कुणाल मनोज माडीवाले हा चोरी झालेल्या कापड दुकानामध्ये कामाला आहे. दुकानाची व रोख रक्कम ठेवण्याचे तिजोरीची इत्यंभूत माहिती त्याला होती. त्यामुळे आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दुकानात चोरी करण्याचा त्याने ठरवले. दरम्यान बँकेला सलग दोन दिवस सुटया असल्याने 25 डिसेंबर रोजी मोठया प्रमाणावर रोख रक्कम दुकानामधील तिजोरीमध्ये ठेवलेली असल्याची त्याला माहिती होती. रविवारी जेव्हा दुकान मालकाने दुकान बंद केले त्यावेळी तो दुकानातील एका खोलीमध्ये लपुन बसला होता. तर दुकानातच झोपला. जेव्हा दुकान परिसरात कोणीच नसल्याची खात्री झाली तेव्हा माडीवाले याने स्ट्रॉंग रुमचा दरवाजा तोडुन रक्कम एका ट्रॅव्हलींग बॅगमध्ये भरुन शटर आतुन उघडुन बाहर आला. तसेच बाहेर नजर ठेवून असलेल्या साथीदारांच्या मदतीने पैसे घेऊन फरार झाला. 


Jalna Crime: जालन्यात खळबळ! प्रसिद्ध होलसेल कापड दुकानात धाडसी चोरी; 1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला